आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात होणार ऑप्टिक फायबरची क्रांती!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- येत्या काळात फोन किंवा तत्सम दळणवळणाच्या यंत्रणेत आमूलाग्र बदल होणार आहेत. यासाठी बीएसएनएलने ऑप्टिक फायबरची सुविधा देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. शहराच्या ज्या भागांतून बीएसएनएलची ऑप्टिक फायबर केबल टाकण्यात आली तेथेच हे कनेक्शन मिळू शकेल. टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्व भागांत ही केबल टाकली जाणार आहे.

तु मच्या सध्याच्या दळणवळण यंत्रणेत फोनमधील खरखर, फोन किंवा इंटरनेट वारंवार ठप्प होणे, कनेक्टिव्हिटी लवकर न मिळणे, इंटरनेट प्लॅननुसार वेग न मिळणे, स्काइप कॉलमध्ये व्यत्यय येणे, यू ट्यूब किंवा एनडीटीव्ही पाहताना बराच काळ बफरिंग होणे, व्हिडिओ कॉलमध्ये आवाज तुटणे, वेबकास्टमध्ये व्यत्यय येणे, साइट व्यवस्थित न उघडणे, नेट बँकिंग व्यवहारात व्यत्यय येणे, उच्च वेगाचे इंटरनेट कनेक्शन न मिळणे यासारख्या अडचणी आहेत. या अडचणी साध्या नाहीत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जीवन सुसह्य व्हावे अशी अपेक्षा असताना या अडचणींमुळे जीवन तापदायक ठरते. याचा परिणाम तुमच्या उत्पादकतेवर होतो. आमच्या प्रत्येकाच्या वाट्याला या अडचणी येतात. हे अडथळे 2005 ते 2008 या काळात जेव्हा तांब्याच्या तारेद्वारे इंटरनेट जोडणी मिळायची तेव्हा नव्हते. गेल्या पाच वर्षांत आमच्या गरजा बदलल्या आहेत. त्यामुळे यापूर्वी तयार करण्यात आलेली यंत्रणा आज अपेक्षित असलेला वेग, दर्जा देऊ शकत नाही. वास्तविक आता तांब्याच्या तारांचे युग संपत आले आहे. दहा वर्षांपूर्वी उपयुक्त ठरलेली ही यंत्रणा आता खर्चिक, र्मयादित, कमी दर्जाची आणि चोरीच्या धास्तीने असुरक्षित ठरत आहे. हा बदल अपेक्षितच होता. म्हणूनच दूरसंचार कंपन्यांनी बिनतारी किंवा ऑप्टिक फायबर जोडण्यांकडे वाटचाल सुरू केली आहे.

सध्या दोन शहरांदरम्यान तसेच अशा मोठय़ा व्यावसायिक ग्राहकांसाठी ऑप्टिक फायबर वापरले जाते, ज्यांना विश्वासार्हता, वेगाने आणि विनाव्यत्यय दळणवळणाची गरज आहे. भारत संचार निगम या (बीएसएनएल) सरकारी कंपनीने मात्र या क्षेत्रात पुढचे पाऊल टाकले आहे. या कंपनीने सर्वांसाठी ऑप्टिक फायबरची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या सेवेसाठी किंचित जास्त खर्च करावा लागेल आणि शहराच्या ज्या भागांतून बीएसएनएलची ऑप्टिक फायबर केबल टाकण्यात आली आहे तेथेच हे कनेक्शन मिळू शकेल. टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्व भागांत ही केबल टाकली जाणार आहे. ज्या भागांत जास्तीत जास्त कनेक्शनची मागणी आहे तेथे प्राधान्याने ही केबल टाकली जाईल. हे नवे तंत्रज्ञान वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणणार आहे.

वेगवान ऑप्टिक फायबर सेवा
आपले सध्याचे इंटरनेट कनेक्शन जास्तीत जास्त 8 मेगाबाइट परसेकंद (एमबीपीएस) एवढाच वेग देते. त्यातही एक्स्चेंजपासून जेवढे जास्त अंतर तेवढा व्यत्यय अशी परिस्थिती आहे. ऑप्टिक फायबरद्वारे थेट 1 जीबीपीएस म्हणजे 1000 एमबीपीएस एवढा वेग आणि दर्जा हमखास मिळतो. हे कनेक्शन घेण्यासाठी 500 रुपये जोडणी खर्च, 1000 रुपये अनामत आणि दरमहा 100 रुपये शुल्क एवढा खर्च येतो. घर किंवा अपार्टमेंटच्या अंतर्गत जुळणीसाठी थोडाफार खर्च येऊ शकतो.

बीएसएनएल 256 केबीपीएस ते 100 एमबीपीएस एवढी कनेक्टिव्हिटी ग्राहकाच्या गरजेनुसार देऊ शकते. ऑप्टिक फायबरचे इंटरनेट प्लॅन्स फारसे खर्चिकही नाहीत. ब्रॉडबँडचे सर्व प्लॅन ऑप्टिक फायबर (एफटीटीएच) सेवेतही लागू होतात. याशिवाय एफटीटीएच सेवेत 20, 50 आणि 100 एमबीपीएसचे अर्मयाद (अनलिमिटेड) प्लॅन्सही आहेत. 10 एमबीपीएससाठी 3999 रुपयांचा, 20 एमबीपीएससाठी 5999 रुपयांचा, तर 50 एमबीपीएस वेगासाठी 9999 रुपयांचा प्लॅन आहे. यात अनुक्रमे 50, 100 आणि 150 जीबीपर्यंत वापर करता येतो.

ऑप्टिक फायबर कनेक्शनमधूनच आयपी लीज लाइन, टेलिफोन, क्लोज्ड युजर ग्रुप, एमपीएलएस-व्हीपीएन, व्हीओआयपी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, आयपी व्हिडिओ कॉल, एचडीटीव्ही, व्हिडिओ ऑन डिमांड, ऑडिओ ऑन डिमांड, दुरस्थ शिक्षण, व्हच्यरुअल क्लासरूम आदी सेवांचा लाभही घेता येऊ शकेल.

ऑप्टिक फायबर सेवा घेऊ इच्छिणार्‍या ग्राहकांना बीएसएनएलकडून एक ऑप्टिकल नेटवर्क टर्मिनेशन (ओएनटी) दिले जाईल, ज्यात 100 एमबीपीएसचे चार इथरनेट पोर्ट आणि 2 साधे टेलिफोन पोर्ट असतील. शिवाय, पॉवर बॅकअपसाठी एक बॅटरीही दिली जाईल, जी किमान तीन तास चालेल. बीएसएनएलच्या कार्यालयातून किंवा फ्रँचायझीमार्फत ओएनटीची जुळणी ग्राहकांना दिली जाईल. ग्राहकांच्या मागणीनुसार वेगवेगळय़ा सेवा या जुळणीतून पुरवल्या जातील.

या अत्याधुनिक सेवेमुळे दळणवळणाच्या क्षेत्रात क्रांती घडून येणार आहे. इंटरनेटचा वेग आणि दर्जा सुधारण्याची क्षमता या तंत्रज्ञानात असल्यामुळे त्याचा बीएसएनएलकडून प्रचार व प्रसार केला जात आहे.