आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The Previous Academic Session Students Parliament Opening Of BAMU

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोपरखळी: चंद्रकांत खैरे साहब, प्यार के किस्से हमारे भी हैं...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विद्यापीठात विद्यार्थी संसदेचे उद्घाटन करताना खासदार चंद्रकांत खैरे. या वेळी महापौर त्र्यंबक तुपे, तुकाराम सराफ, आमदार संजय शिरसाट, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे आदी)
औरंगाबाद- ‘खैरेसाहब, प्यार के किस्से हमारे भी हैं..!’ हिंदीतील याच संवादफेकीने भाषणाची सुरुवात करत पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना भाषणातून अनेक कोपरखळ्या मारल्या. एवढ्यावरच थांबता ते म्हणाले, ‘खैरे साहेब, तुमच्या वयात मस्ती करु नये. आम्ही योग्य वेळी योग्य काम केले आहे.’
अशी गुगली शिरसाट यांनी फेकली. निमित्त होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मागील शैक्षणिक सत्राच्या (२०१४-१५) विद्यार्थी संसदेच्या उद्घाटनाचे.
विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेवर मागील वर्षी भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सचिव निवडून आले आहेत. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना विद्यार्थी संसदेचे उद्घाटन करायचे होते. मात्र, त्यांनी वेळ दिल्यामुळे शैक्षणिक सत्र संपल्यानंतर खैरे यांच्या हस्ते आगामी शैक्षणिक सत्राच्या तोंडावर (२०१५-१६) सोमवारी उद्घाटन करण्यात आले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेत आणि सुट्यांच्या काळात विद्यार्थी गावी गेल्यामुळे मोजक्याच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. १२.३० वाजेची नियोजित वेळ असताना खैरे सुमारे तासभर उशिरा म्हणजेच दीड वाजता कार्यक्रमस्थळी आले. तोपर्यंत उद्घाटनाशिवाय कार्यक्रम सुरू करण्यात आला होता.
शिरसाट, महापौर त्र्यंबक तुपे, अंबादास दानवे यांचे स्वागत, परिचय आणि प्रास्ताविक विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष लखनलाल भुरेवाल यांनी करून घेतले होते. अन्य पदाधिकाऱ्यांचे मनोगत सुरू असताना खैरे आले. त्यानंतर लगेच शिरसाट यांनी माइकचा ताबा घेऊन "दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय' म्हणत भाषण सुरू केले. त्या वेळी खैरेंच्या लेट लतीफशाहीवर बोट ठेवत शिरसाट म्हणाले, "आधीच विद्यार्थी परिषदेचे वर्षभर उशिराने उद््घाटन होत आहे. त्यात आपणही उशिरा येतो. मी मात्र शाळा, कॉलेजात अत्यंत हुशार आणि गुणवंत होतो. त्यामुळे विद्यापीठाच्या कार्यक्रमालाही वक्तशीरपणा दाखवला अन् वेळेवर आलो. कुलगुरू माझ्यापेक्षाही गुणवंत आहेत. त्यामुळे ते तर माझ्या आधीच बसलेले होते. खैरे साहेब, तुम्ही मात्र उशिरा आल्यामुळे आपण कुठे आहोत याचा विचार करावा,' अशी जाहीर टिप्पणी शिरसाट यांनी केली. शिवाय स्वत:च्या प्रेमाचे अनुभव विद्यार्थ्यांसोबत ‘शेअर’ करत शिरसाट यांनी उपस्थितांना हसवले. "उशिरा प्रपोज केल्यामुळे मुलीने आता लग्न जमल्याचे सांगितल्याने आपण व्यथित झालो होतो. त्यामुळे योग्य वेळेत योग्य कामे केली पाहिजेत. खैरेंच्या काळात मस्ती नको, योग्य वेळेतच योग्य कामे झाली पाहिजेत..!' असेही त्यांनी म्हटले.
केंद्रीय विद्यापीठासाठी प्रयत्न करू : खैरे
खैरेयांनी कुलगुरूंना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. केंद्रीय विद्यापीठासंदर्भात मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याशी चर्चा करणार आहे. शिवाय विद्यापीठाचे रखडलेले सर्व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रात रेटा लावू, असेही त्यांनी म्हटले. महापौर तुपे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, विद्यार्थी सेनेचे विद्यापीठ प्रमुख तुकाराम सराफ यांची भाषणे झाली. व्यासपीठावर विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे होते. कुलगुरूंनी अध्यक्षीय समारोप केला. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थी परिषद सचिव माधुरी मिरकरने आभार मानले.