आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारितोषिकाच्या रकमेतून पाच बंधाऱ्यांची निर्मिती, कुंभेफळ बनले स्मार्ट व्हिलेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कुंभेफळ ग्रामपंचायतीला मिळालेल्या चोवीस लाख रुपयांच्या पुरस्काराचे पदाधिकाऱ्यांनी "चीज' केले. पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेत परिसरातील उजाड झालेली शेती फुलवण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली. लोकसहभागातून बोर नदीपात्रावर साडेतीन कि. मी. पेक्षा जास्त लांबीचे शिरपूर पॅटर्नचे पाच बंधारे बांधून साडेतीनशे एकरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली आणण्याचे पाऊल उचलले आहे. भविष्यात डीएमआयसी प्रकल्पामुळे स्मार्ट सिटी नावारूपास येणार आहे. मात्र त्यापूर्वी कुंभेफळ "स्मार्ट व्हिलेज' ठरले आहे. विकासाची कास धरताना ग्रामपंचायतीने आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

औरंगाबाद शहराची अनियमित वाढ रोखण्यासाठी शासनाने शहराशेजारील गावांसाठी झालरक्षेत्र नऊगाव योजना आणली. झालरक्षेत्रात २८ तर नऊगाव योजनेत शेंद्रा आैद्योगिक वसाहतीशेजारील नऊ गावांचा समावेश करण्यात आला. मात्र सरकारी विकासाची वाट पाहता ग्रामस्थांच्या सहभागातून कुंभेफळ ग्रामपंचायतीने विकासाची कास धरली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून जिल्ह्यात प्रथम तर विभागात द्वितीय येण्याचा मान मिळवला. पंचायत राज योजनेत विभागात दुसरा क्रमांक पटकावला. या पुरस्कारांतून ग्रा.पं. ला २४ लाख रुपये मिळाले.
सीसीटीव्ही यंत्रणा
औरंगाबादच्या सुरक्षेसाठी असलेली सीसीटीव्ही यंत्रणा कमकुवत आहे. परंतु साडेचार हजार लोकसंख्येच्या कुंभेफळ गावात ४० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. स्वच्छतेसाठी डस्टबीन दिल्या असून, सकाळी एक गाडी कचरा जमा करते. या कचऱ्यापासून गांडूळखत बनवण्याच्या प्रकल्पावर काम सुरू असल्याचे सरपंच कांताबाई सुधीर मुळे यांनी सांगितले.
आधुनिकीकरणाची धरली कास
कुंभेफळलाकारखान्यांकडून कर स्वरूपात उत्पन्न मिळते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केवळ पाच रुपयांत आरोच्या वीस लिटर शुद्ध पाण्याचा जार घरपोच दिला जातो. यासाठी आठ लाखांचा प्रकल्प उभारण्यात आला. गावातीलच विहिरीचे पाणी शुद्ध केले जाते. ग्रामपंचायत आवार अत्यल्प दरात मंगल कार्यांसाठी उपलब्ध करून दिला जातो. युवकांसाठी आधुनिक व्यायामशाळा उभारण्यात आली आहे.
लक्षाधीश माहेरघर योजनाही राबवली
गावातज्या कुटुंबात एका मुलीनंतर दुसरीही मुलगी जन्मली तर ग्रामपंचायतीच्या वतीने दुसऱ्या मुलीच्या नावावर १९ हजार रुपये ठेवी काढली जाते. अठरा वर्षांनंतर या मुलीस लक्षाधीश योजनेत एक लाख रुपये मिळतात. गरोदर महिलांसाठी माहेरघर योजना सुरू केली आहे. गावातील एका खोलीत त्यांना गर्भसंस्काराची पुस्तके पुरवली जातात. सोबतच सकस आहार दिला जातो. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण शून्यावर आले. गावातील शंभर टक्के घरांमध्ये शौचालये आहेत. गावातील १२० मुलांची २९ एप्रिल २०१५ रोजी ग्रामसभाही घेण्यात आली.
बोर नदीवर शिरपूर पद्धतीचे उभारले बंधारे
शिरपूरपॅटर्नच्या बंधाऱ्यांच्या कामाचा अनुभव असलेले देवगिरी नागरी सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच कांताबाई सुधीर मुळे, उपसरपंच श्रीराम शेळके, रावसाहेब मुळे, तुकाराम गोजे, रामदास गोजे, बळीराम गोजे यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांनी बोर नदीवर बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला.
बंधाऱ्यांचे काम अंतिम टप्प्यात
बोरनदीचा उगम बोडखा-नाथनगर परिसरातून आहे. ही नदी कुंभेफळ शिवारात प्रवेश करते. नदीवर पाच कोल्हापुरी बंधारे बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. एका बंधाऱ्याची लांबी ७५० मीटर आहे. पाच बंधाऱ्यांची लांबी साडेतीन कि. मी. इतकी होते. बारा फुटांपेक्षा जास्त खोली ठेवल्याने पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण वाढेल. हे बंधारे भरल्यानंतर दोन कि. मी. परिसरापर्यंतच्या शेतीला त्याचा लाभ होणार असून शेतकऱ्यांची उन्नती होईल.
जलसंधारणाला प्राधान्य ; साडेतीन किमी नदीपात्रात थांबेल पाणी
वाढत्या शहरीकरणामुळे औरंगाबादच्या कक्षा कुभेफळपर्यंत गेल्या. आैद्योगिक वसाहत विकसित झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या. कुंभेफळ येथे केवळ ३० टक्केच शेती उरली. नागरिकांनी शेंद्रा, कुभेफळ परिसरात घरांच्या प्रकल्पांत गुंतवणूक केली. यामुळे ग्रामस्थांनी उर्वरित ३० टक्के शेती फुलवण्यासाठी पुरस्काराच्या स्वरूपात मिळालेली रक्कम जलसंधारणावर खर्च करण्याचा एकमुखी निर्णय घेतला.
विकासासाठी पक्षभेद बाजूला
गावात केवळ ३० टक्के शेती शिल्लक आहे. शहरीकरणात शेती टिकावी यासाठी जलसंधारणावर लक्ष केंद्रित केले आहे. देवगिरी बँकेच्या शिरपूर बंधारे निर्मितीच्या अभियानातून प्रेरणा घेऊन बोर नदीवर लोकसहभागातून बंधारे बांधले. विकासाच्या प्रश्नावर आम्ही पक्षभेद बाजूला ठेवले. सरपंच काँग्रेस तर उपसरपंच भाजपचा असताना विकासात मात्र कुठेही बाधा नाही.
- श्रीराम शेळके, उपसरपंच,कुंभेफळ
बातम्या आणखी आहेत...