आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डेंटलमध्ये १०० जागा भरण्याचा प्रस्ताव, अधिष्ठाता डॉ. डांगेंनी आरोग्य परिषदेसमोर मांडली बाजू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्रीय दंत परिषदेने पायाभूत सुविधा नसल्याचा ठपका ठेवत औरंगाबाद दंत महाविद्यालयाला २०१३ मध्ये वाढवून दिलेल्या १० जागा रद्द करण्यात याव्यात अशी शिफारस आरोग्य परिषदेपुढे केली होती. याविषयी दंत महाविद्यालयाची बाजू मांडण्यासाठी अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे दिल्लीत गेले होते. त्यानंतर १० जागा सुरक्षित असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. यासोबतच उपलब्ध मूलभूत सुविधांच्या आधारे १०० जागांसाठी तसेच सुपरस्पेशालिटीसाठी प्रस्ताव लवकरच सादर करत असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीला सांगितले.
एप्रिल आणि जून महिन्यात दंत परिषदेच्या पथकाने महाविद्यालयाला भेटी दिल्या होत्या. या वेळी पदवीपूर्व कृत्रिम दंतशास्त्र आणि पदवीपूर्व दंतशल्यशास्त्र या प्रयोगशाळांचे क्षेत्रफळ वाढण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती. दंत परिषदेच्या नियमाप्रमाणे या प्रयोगशाळा १५०० चौरस फुटांच्या जागेत असणे अपेक्षित आहे. पथक आले तेव्हा ११८४ चौरस फुटाची प्रयोगशाळा १९०० चौरस फुट करण्याचे काम हाती घेतलेले होते. मात्र प्रत्यक्षात पथक आले तेव्हा हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, तसे नसल्याने त्यांनी १० जागांची मान्यता रद्द करण्याची शिफारस केली होती.

या प्रकरणात महाविद्यालयाची चूक नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाची दिरंगाई कारणीभूत असल्याचा आरोप डॉ. डांगेंनी केला होता. तर शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची जबाबदारी वैद्यकीय संचालनालयाची आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. ऑगस्टपर्यंत प्रयोगशाळा विस्तारीकरणाचे काम पूर्ण होईल. दरम्यान, लाखांच्या आतील उपकरणे अधिष्ठातांच्या अखत्यारीत खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागा लवकरच भरण्यात येतील, असे आश्वासन संचालनालयाने दिल्याचे डॉ. डांगे यांनी स्पष्ट केले.

सुपर स्पेशालिटी आणि १०० जागा
महाविद्यालयात ५० जागांसाठी दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. १०० जागांच्या महाविद्यालयासाठी ५० हजार चौरस फूट जागा अपेक्षित आहे. प्रत्यक्षात दंत महाविद्यालयाकडे सव्वाशे चौरस फूट जागा उपलब्ध आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा दुप्पट जागा असल्याने १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येऊ शकतो. म्हणून आम्ही लवकरच १०० जागांसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवत आहोत, असे डॉ. डांगे म्हणाले. यासोबतच सुपरस्पेशालिटी विभाग सुरू करण्यासाठीचा प्रस्तावही तयार करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...