आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Remains Of The Ancient Temples Ignore Paithan Years

पैठणच्या प्राचीन मंदिरांचे अवशेष वर्षानुवर्षे दुर्लक्षित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-पैठण येथील दोन प्राचीन मंदिरांचे अवशेष कित्येक वर्षांपासून सोनेरी महालच्या बाजूला चक्क मातीमध्ये झिजत आहेत. यात कोरीव काम केलेले खांब, नक्षीकाम केलेल्या दगडी चौकटी, मूर्ती तसेच वेगवेगळ्या आकारांच्या आकर्षक शिळा आहेत. या अवशेषांच्या आजूबाजूला असंख्य झुडपे, गवत उगवले आहे. यातील अनेक शिल्पे झिजून गेली आहेत. मात्र याकडे पुरातत्त्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
पर्यटन राजधानी म्हणून संबोधल्या जाणार्‍या शहरात प्राचीन अनमोल ठेव्यांची डोळ्यादेखत माती होताना बघावे लागत आहे, यापेक्षा काय दुर्दैव असू शकते, अशी खंत विद्यापीठ परिसरात फिरायला जाणार्‍या अनेकांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली आहे. या विषयाकडे माध्यमांनी अनेक वेळा लक्ष वेधले असले तरी पुरातत्त्व विभागाकडून काहीच हालचाल होताना दिसत नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या अवशेषांपासून मंदिर उभारण्याचे पुरातत्त्व विभागाचे नियोजन होते, असे समजते. मात्र जेव्हापासून हे अवशेष पैठणमधून आणले गेले, तेव्हापासून ते त्याच जागी पडून आहेत. सोनेरी महालच्या संरक्षक भिंतीच्या उजव्या बाजूला तसेच मागच्या बाजूला हे शेकडो अवशेष पडून आहेत.ऊन-वारा-पावसाचा परिणाम होऊन कित्येक शिल्पे झिजली आहेत. या परिसराचा उपयोग खेळण्याचे मैदान म्हणून होत असल्याने हे प्राचीन अवशेष अनेकदा पायदळी तुडवले जातात. याच भागात या वर्षी विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचे मुख्य व्यासपीठ होते.
जागा असताना उघड्यावर का?
सोनेरी महालच्या आतील परिसरात दोन्ही बाजूंनी मोठी जागा असताना त्या जागेचा ही शिल्पे ठेवण्यासाठी उपयोग होत नाही. विशिष्ट प्रकारचे बांधकाम करून या शिल्पांचे संवर्धन होऊ शकते. मात्र त्याकडे कायम दुर्लक्ष केले जात आहे. या अवशेषांमध्ये नक्षीदार दगडांच्या चौकटी असून त्यांचा सुंदरतेने उपयोग होऊ शकतो. सोनेरी महाल बघण्यासाठी येणार्‍यांना हीसुद्धा एक खास पर्वणी ठरू शकते. असे सगळे असताना विभागाचे दुर्लक्ष पर्यटनप्रेमींना कमालीचे दुखावणारे आहे, अशी मते व्यक्त होत आहेत.
नियोजन आहे, प्रस्तावाचे माहीत नाही
हे सर्व मंदिरांचे अवशेष सोनेरी महालच्या आतील बाजूला चबुतर्‍यावर मांडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर निधीही अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे किंवा नाही, याविषयी सांगता येणार नाही. उदय सुर्वे, सहायक अभिरक्षक, सोनेरी महाल वस्तुसंग्रहालय.
वेरूळ महोत्सवाचे निमित्तही संपुष्टात
औरंगाबाद-वेरूळ महोत्सवाचे आयोजन याच सोनेरी महाल परिसरात सलग काही वर्षे झाले. या महोत्सवामुळेच ही शिल्पे व अवशेष महालच्या आतल्या भागात ठेवण्यात आले नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, आता तर काही वर्षांपासून महोत्सवही बंद पडला असल्याने वेळकाढूपणाचे निमित्तही संपुष्टात आल्याचे स्पष्ट होत आहे.