आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वांच्या संवेदना सारख्याच- नाना पाटेकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-विविध देशांतील चित्रपट पाहताना तेथील सामाजिक, भौगोलिक आणि राजकीय परिस्थिती आपल्याला जवळून पाहता येते. सुखे सर्वांची वेगवेगळी असतीलही; पण दु:खे मात्र सारखीच असतात. दु:खाविषयीची मानवी संवेदना विश्वातील प्रत्येकाला सारखीच असते, अशी भावना प्रख्यात सिनेअभिनेते पद्मर्शी नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. पहिल्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी शहरात आले असता ते बोलत होते. आपल्या आगळ्यावेगळ्या कणखर शैलीत शब्दफेक करत त्यांनी सर्वांना जिंकले. राजकारण, समाजकारण, अभिनय, चित्रपट, नाटक आणि शहरांचे भीषण वास्तव यावर त्यांनी केलेली चौफेर फटकेबाजी त्यांच्याच शब्दांत..
मी माझ्यातील घुसमट बाहेर काढण्यासाठी या क्षेत्रात आलो. समाजात घडणारे अराजक पाहून मी शांत बसूच शकत नव्हतो. जर मला ही व्यक्त होण्याची वाट मिळाली नसती, तर कदाचित मी गुंड झालो असतो किंवा वेडाही झालो असतो. तुम्ही सगळे कसे पचवता, मला माहिती नाही. माझ्याकडे माध्यम आहे त्याद्वारे मी सर्व बाहेर काढतो. आम्ही सगळी मंडळी नशीबवान आहोत, यातून आम्ही सगळे बाहेर काढतो. व्यक्त होतो. असो. या महोत्सवाच्या निमित्ताने विविध देशांतील चित्रपट तुम्हाला पाहता येतील. यातून तेथील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती पाहता येईल; पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे भावनांना अनुभवता येते. परिस्थितीनुसार सर्वांची सुखे वेगवेगळी आहेत, मात्र माणूस म्हणून सर्वांची संवेदना सारखीच असते. म्हणून आपण तेथे तद्रूप होतो. चित्रपट माझ्या मते स्वत:क डे पाहण्याचे एक प्रतिबिंब आहे. इतरांची आभाळाएवढी दु:खे पाहिल्यानंतर आपली दु:खे कमी वाटू लागतात. आपला समतोल सांभाळण्यासाठीसुद्धा चित्रपट पाहणे महत्त्वाचे आहे.
माझी दु:खे चिरंजीव असावीत..
नट म्हणून मी सुखी नाही. एका भूमिकेतून दुसरीमध्ये जाताना नव्या भूूमिकेची दु:खे मी अनुभवतो. नव्या वेदना मला घ्याव्या लागतात. अशी फरपट जर एखाद्या नटाची होत असेल, तर तो सर्वात नशीबवान नट आहे, असे मी मानतो. ज्यांची फरपट थांबते, ती मंडळी नट म्हणून संपतात. मग ती कुठेतरी समारंभात दिसतात नटलेली. कारण अस्तित्व संपलेलं असतं. माझी दु:खे चिरंजीव असायला हवीत अश्वत्थामासारखी. अशा वैविध्यपूर्ण कलाकृती, दु:ख पाहताना आपण समृद्ध होत असतो. नाही तर आपण एका कोषात अडकून राहतो.
माझ्या आयुष्यात वर्णाला महत्त्व..
माझी सगळी भावंडं फार गोरीगोमटी असल्याने माझ्याकडं दुर्लक्ष व्हायचं. चौथीत असताना नाटकात काम केलं. त्याचं वडिलांनी तोंडभरून कौतुक केलं. त्यामुळे नाटकात आलो. सिनेमात यायची कधी इच्छा नव्हती. स्मिता पाटीलने मला चित्रपटात आणलं. तिच्यात आणि माझ्यात एक समान धागा म्हणजे आम्ही दोघे काळे होतो. आज वाटतं चित्रपट हे माध्यम प्रभावी आहे, एका क्षणात करोडो लोकांना खूप काही सांगता येतं. चित्रपटाने मला समाधान दिले.
राजकारणाचा विषय नको..
राजकीय मंडळी मला त्यांच्या पक्षात येण्याची गळ घालतात. परंतु माझ्या फटकळ स्वभावामुळे मला राजकारण शक्य नाही. कुठल्याही पक्षाचा नसताना कशावरही बोलण्याची ताकद तुम्हाला चित्रपटामुळे मिळते. सर्वच पक्षात माझे मित्र आहेत. परंतु आजवर कोणाकडेही मी काहीही मागितले नाही. त्यामुळे माझी किंमत ठरली नाही. ज्या दिवशी आपण काही मागतो तेव्हा मिंधे होतो.
छोटसं कुंडीतलं रोपटं.
हा चित्रपट महोत्सव म्हणजे कुंडीतलं छोटसं लावलेल पहिलं रोपटं आहे. याचं सौंदर्य आहे. कारण रोपटं मोठ झालं की, दगड मारणारे भरपूर मिळतील. या महोत्सवाचा असा सोहळा पुन्हा होणार नाही कदाचित, कारण तो सतत मोठा होत जाणार आहे. पुढे हा मैदानावर घ्यावा लागेल. हे होतच राहणार, कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात अशीच असते. आपलं दिसणं फक्त पहिल्या दोन मिनिटांसाठीच असतं. पुढे कर्तृत्वच महत्त्वाचं.