औरंगाबाद - कर्नाटकी वादन अन् जयपूर-लखनऊ घराण्याची कथ्थक वादनशैली यांचा मेळ घालत सहाव्या शारंगदेव महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी झाली. एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात तालनादाचा विलक्षण सोहळा हृदयात साठवत रसिकांनी नव्या-जुन्या परंपरांचा मेळ अनुभवला. तरुण कलावंतांचे दमदार पारंपरिक वादन दाद मिळवून गेले. तर प्रख्यात नृत्यांगना मालबिका मित्रा यांची कथ्थक अदाकारी ईश्वराशी बंधन जोडणारी होती.
महोत्सवाची सुरुवात सतीश कृष्णमूर्ती, मीनाक्षी सुंदरम, अदिती देवराजन, हरिहरन सुब्रमण्यम यांच्या वादनाने झाली. २४ ते २९ वयोगटातील हे तरुण कलावंत स्वरमंचावर येताच अद्भुत वादनाविष्कार अनुभवण्यास येणार याचा अंदाज रसिकांना आला. दाक्षिणात्य पारंपरिक पोषाख अन् खास शैलीतील वाद्य लक्ष वेधत होते. तालवाद्य कचेरी असे या कलाप्रकाराचे नाव आहे. वेदांतील श्लोकांचे पठण अन् वादन हे या कलाप्रकाराला नादमयी आयाम देत होते. गणेशवंदनेने त्यांनी वादनाला सुरुवात केली. उत्तरभारतीय संगीताशी साधर्म्य असलेला कोणुकल हा वादनप्रकार दाद मिळवणारा ठरला. धावील, व्हायोलिन, कंजिरा आणि मृदंगम, घटमचा हा अद्भुत मेळ तल्लीन करणारा होता. युवा कलावंतांचे वादनातील प्रभुत्व दाद देण्यासारखे होते. दमदार वादनाने औरंगाबादकर रसिकांना तृप्त करत त्यांनी स्वरमंचाचा निरोप घेतला.
मनलागा मेरा यार फकिरी में... : प्रख्यातनृत्यांगना मालबिका मित्रा यांनी दुसऱ्या सत्रात रंगमंचाचा ताबा घेतला. नृत्यातील प्रभुत्व त्यांनी अदाकारीतून सिद्ध केले. एखादा जुनाजाणता कलावंत कलेला विविधांगी रूपात सादर करताना तिचे सौंदर्य आणि पावित्र्य कसे अबाधित ठेवतो, याचे उत्तम उदाहरण मित्रा यांची कथ्थक अदाकारी होती. सौरभ राय आणि तपश्नीपाल मुजुमदार यांच्यासह केलेले कथ्थकचे विलक्षण सादरीकरण रसिकांना अनुभवता आले.
आज महोत्सवात सकाळच्या सत्रात
संगीत रत्नाकरांचे प्रबंध : म्हैसूरचे विद्वान नंदकुमार
ओडिसी परंपरा : कोलकत्याच्या गुरू शर्मिला बिश्वास
सायंकाळी
कथ्थक : पार्वती दत्ता आणि महागामी समूह, औरंगाबाद
ओडिसी : शर्मिला बिश्वास आणि समूह, कोलकाता