आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या विद्यार्थ्यांत भडकले ‘टोळीयुद्ध’; दोघे गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जुन्या भांडणावरून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांत शनिवारी सकाळी टोळीयुद्ध भडकले. एका गटाने धारदार शस्त्राने वार केल्याने दोन विद्यार्थी जखमी झाले. यातील एका विद्यार्थ्याला गंभीर इजा झाली. ही घटना हडको परिसरातील होमगार्ड मैदानाजवळ सकाळी ९.४५ वाजता घडली. रोहित अजित अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे असून रोहित गंभीर जखमी झाला आहे. (सर्व मुले अल्पवयीन असल्याने पूर्ण नावे घेतली नाहीत.) 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित हा दहावीचा विद्यार्थी आहे. रोहित त्याचे मित्र हडको परिसरातील एका शाळेत स्नेहमिलनासाठी निघाले होते. रोहित हा अजित, निखिल आणि अन्य मित्रांसोबत निघाला होता. सर्व मित्र सोबतच जात असताना सकाळी ९.४५ च्या सुमारास त्यांना हाेमगार्ड मैदानाजवळील रस्त्यावर हर्सूल येथील पंधरा ते सतरा वर्षे वयोगटातील तरुणांनी अडवले. या टोळक्यातील एका मुलासोबत रोहितचा जुना वाद होता. तो मुलगाही दहावीचाच विद्यार्थी आहे. रोहितला अडवून त्याने जुने भांडण उकरले. त्यांच्यात प्रथम शाब्दिक चकमक झाली. रोहितच्या मित्रांनी मध्यस्थी करत त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने रोहितसह त्याच्या मित्रांनाही अर्वाच्य शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने प्रकरण हातघाईपर्यंत पोहोचले. दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी सुरू झाली. 
 
समोरील गटातील एका युवकाने रोहित त्याच्या मित्रांवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात रोहित त्याचे दोन मित्र जखमी झाले. परंतु रोहितचा वाद असलेल्या अल्पवयीन युवकाने रोहितवर अधिक जोमाने वार केल्याने रोहितच्या पाठीला मोठी इजा पोहोचून रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे हल्ला करणारे सर्व युवक पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या रोहित आणि अजितला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्लेखोरांच्या टोळीतीलही एक तरुण जखमी झाला आहे. मात्र तो घटनास्थळावरून पसार झाल्याने त्याचे नाव कळू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी जखमी झालेल्यांपैकी कुणीही तक्रार दिली नसल्याने रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता. 

रोहितवर खासगीत उपचार 
रोहितवर जळगाव रोडवरील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यामुळे सिडको पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून रात्री सिटी चौक पोलिसांकडे वर्ग केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितच्या पाठीवर खोलवर वार झाल्याने मोठा रक्तस्राव झाला आहे. 

पोलिसांनी ताटकळवले 
रोहितचा एक जखमी मित्र शनिवारी दुपारी सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी आला होता. मात्र, पोलिसांनी बराच वेळ त्याला प्रतिसाद दिला नाही. तो पाऊण तास पोलिस तक्रार घेतील याची प्रतीक्षा करत उभा राहिला. त्याला बस म्हणण्याचे सौजन्यही पोलिसांनी दाखवले नाही. त्यामुळे तो ठाण्यातून परत गेला.
 
दोन्ही गटांत तडजोड
: टोळीयुद्धातील सर्वच युवक अल्पवयीन आहेत. त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करता त्यांच्या पालकांनी तडजोड केल्याने या प्रकरणात पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...