आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Standing Committee Meeting, Latest News, Divya Marathi

स्थायी’ची बैठक अवघ्या चार मिनिटांत आटोपली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आचारसंहिता लागू होण्याच्या काही मिनिटे आधी शेवटची स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. अवघ्या साडेचार मिनिटांत ही सभा आटोपली आणि त्यात अजेंड्यावरील दोन आणि ऐनवेळचे तीन असे एकूण सात विषय मंजूर करण्यात आले. दुसरीकडे, दुपारची सर्वसाधारण सभा आचारसंहितेमुळे काहीही कामकाज न होता तहकूब करण्यात आली.
गेल्या महिनाभरापासून दर आठवड्याला, तर कधी आठवड्यातून दोन वेळा स्थायी समितीच्या बैठका घेण्यात येत होत्या. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता थेट मेच्या मध्यापर्यंत राहणार असल्याने आणि आपली मुदत एप्रिलमध्येच संपत असल्याने सभापती नारायण कुचे यांनी जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्यासाठी या बैठका बोलावल्या. आज बुधवारी आचारसंहिता लागू होणार असल्याने 11 वाजता होणारी बैठक निवडणूक आयोगाची घोषणा होण्याआधीच उरकण्याचा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला आणि चक्क 9 वाजून 40 मिनिटांनी बैठक सुरूदेखील झाली. अवघ्या साडेचार मिनिटांत सात विषयांना मंजुरी देत ही बैठक संपवण्यात आली.
बजेट लटकले : वास्तविक, निर्धारित कार्यक्रमानुसार आज सकाळी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती; पण विरोधकांनी राहुल गांधी यांच्या सभेमुळे दुपारी 3 वाजता सभा घेण्याची विनंती केली होती. दरम्यान, सकाळीच आचारसंहिता लागू केल्याची घोषणा झाल्याने केवळ वंदे मातरम्पुरती सभा होणार हे निश्चित झाले. अवघ्या 27 सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक कोणतेही कामकाज न होता स्थगित करण्यात आली.
महापौर-सभापतींत पुन्हा चकमक : मंगळवारी अर्थसंकल्पात कामे घुसवण्यावरून महापौर कला ओझा व स्थायी समिती सभापती नारायण कुचे यांच्यात जोरदार चकमक झाली होती. आजदेखील या दोघांत पुन्हा चकमक झडली. स्थायी समितीत येणारे ऐनवेळचे विषय मला सांगा, असा लकडा महापौरांनी सभापतींकडे लावला. मात्र, तोंडी विषय सांगत कुचे यांनी त्यांची बोळवण केल्याने त्या चांगल्याच भडकल्या. अखेर त्यांना सभापतींनी ऐनवेळच्या विषयांचा तपशील दिलाच नाही. नगरसचिवांकडून महापौरांना तो मागवून घ्यावा लागला. तोपर्यंत स्थायी समितीने त्या विषयांना मान्यता देऊन टाकली होती.
पालिकेत शुकशुकाट
आज स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेची बैठक असली, तरी मनपात शुकशुकाट होता. सर्वसाधारण सभा तर प्रारंभी गणपूर्तीअभावी तहकूब करावी लागली. नंतर कशीबशी गणपूर्ती झाली आणि सभा सुरू होऊन स्थगित करण्यात आली. आचारसंहिता लागू झाल्याने बहुतेक नगरसेवकांनी मनपात येणेच टाळले. त्यात उपमहापौर संजय जोशी, सभापती नारायण कुचे यांचा समावेश होता. आता निवडणुका होईपर्यंत मनपात हाच शुकशुकाट पाहायला मिळणार आहे.