आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानार्जनासाठी शेतकरी आजोबांची धडपड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - वृद्धापकाळाचा सदुपयोग करण्यासाठी एका ज्येष्ठ नागरिकाने नामी शक्कल लढवली आहे. हा महत्त्वाचा वेळ केवळ गप्पागोष्टी किंवा देवदर्शनात घालवता मदन शेषराव शिंदे हे आजोबा ज्ञानार्जनासाठी याचा उपयोग करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या जवळपास प्रत्येक विषयाच्या सेमिनार, कॉन्फरन्स आणि भाषणाच्या कार्यक्रमांना ते उपस्थिती लावतात. आयोजकांच्याच परवानगीने शेतीविषयक आपले मत मांडतात. ज्ञानार्जनासाठी त्यांची धडपड आणि शेतीविषयक विचार उपस्थितांना अचंबित करतात. दिवसभर एखाद्या डेलिगेटप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छाशक्ती तरुणांनाही लाजवून टाकते.
विद्यापीठात दररोज एखादा सेमिनार, कॉन्फरन्स, कार्यशाळा, दिन विशेषाचे सेलिब्रेशन किंवा मान्यवरांची भाषणे होतात. या कार्यक्रमात एका ज्येष्ठ नागरिकाची उपस्थिती सर्वांच्या लक्षात येते. ६७ वर्षांचे मदन शेषराव शिंदे हे शेतकरी आजोबा अावर्जून अशा कार्यक्रमांना हजेरी लावतात. ते काही डेलिगेट, निमंत्रित नसतात. अशा कार्यक्रमात मार्गदर्शन करणाऱ्यांइतपत पदव्याही त्यांच्याकडे नसतात, तरी आयोजकांना विनंती करून ते अशा कार्यक्रमात उपस्थित राहतात. आजाेबांची ज्ञानार्जन करण्याची इच्छाशक्ती पाहून मग अायोजकही लगेच त्यांना होकार देतात.वैचारिक कार्यक्रमांना हजेरी : आतापर्यंतजागतिक महिला दिवस, शेतकरी परिषद, सीताफळ परिषद, डॉ.वि. ल. धारूरकर यांचा निरोप समारंभ, विज्ञान प्रदर्शन, विज्ञान परिषद अशा कितीतरी कार्यक्रमांना ते उपस्थित राहिले आहेत. ते वृत्तपत्र विभागात वृत्तपत्र, मासिके वाचन करण्यासाठीही जातात. करमणूकप्रधान कार्यक्रमात त्यांना रस नाही. विद्यापीठासोबतच एमजीएम कॉलेज, यशवंतराव चव्हाण सभागृह, तापडिया नाट्यगृह अशा ठिकाणी होणाऱ्या वैचारिक कार्यक्रमांना ते जातात. विशेष म्हणजे बेगमपुरा ते पुढील प्रवास पायीच करतात. मदन शिंदे यांना कोणतेच व्यसन नाही. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप ही तंदुरुस्त आरोग्याची गुरुकिल्ली असल्याचे ते सांगतात.

विनोबा भावेंचा आदर्श : शिंदेयांना ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, विनोबा भावेंचा सहवास लाभलाय. विद्यार्थिदशेत चार वेळेस त्यांनी बाबांच्या आश्रमात स्वयंसेवक म्हणून १५-१५ दिवस काम केले आहे. विनोबा भावेंना भेटण्याची संधीही मिळाली. विनोबा भावेंचे मौन होते. शिंदे यांनी मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याचे लिहून पाठवले. शेतकऱ्याचा मुलगा आहे तर आयुष्यभर शेती कर, शेतकऱ्यांसाठी काम कर, असे विनोबा भावे म्हणाले. हा आदेश शिरसावंद्य समजून ते आयुष्यभर कार्य करत आहेत. आपल्या १६ एकर शेतीत शिंदे यांनी विविध प्रयोग केले आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. ते शेतकरी संघटनेचे कामही करतात.

ज्ञानार्जनासाठी वय नाही : मनुष्यहा आयुष्यभर विद्यार्थी असतो. ज्ञान मिळवण्यासाठी वयाचे बंधन नसते. मिळवलेले ज्ञान कधीच वाया जात नाही. यामुळेच माझी ज्ञान मिळवण्यासाठी ही धडपड सुरू आहे. याचा निश्चितच फायदा होतो. चारचौघांत बोलताना आपले वेगळेपण जाणवते. विद्यार्थ्यांनी आळस करता निदान आपल्या विभागाच्या कार्यक्रमांना तरी उपस्थित राहायला हवे.- मदन शेषराव शिंदे, शेतकरी

स्वत:चे मतप्रदर्शनही
मधल्या वेळेत पुन्हा अायोजकांना विनंती करून आपले मतप्रदर्शन करण्याची परवानगी घेतात. कार्यक्रमात सादर झालेल्या विषयापासून शेतकरी आत्महत्या, रासायानिक खतांमुळे होणारे जमिनीचे नुकसान, आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद, शेतमालाची आयात-निर्यात बदललेली पीक पद्धती आदी विषयांवर ते मत मांडतात आणि ग्रामीण बाजातील म्हणींचा आधार घेतात.

सहा जण विद्यापीठात
मदन शेषराव शिंदे हे मूळ मानवत तालुक्यातील मानोली गावचे. त्यांचा मुलगा, नातू असे सहा जण विद्यापीठात वेगवेगळ्या विभागात शिकत आहेत. कोणी पदव्युत्तर पदवी तर कोणी पीएचडी करतंय. त्यांच्या शिक्षणासाठी मदन शिंदे बेगमपुऱ्यात घर करून राहतात. या मुलांमुळे मदन यांना विद्यापीठात होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती मिळते. मुलांकडूनच ते याबाबतीतील ज्ञान घेतात. स्वत:कडील संदर्भ साहित्याचे वाचन करतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर त्या ठिकाणी पोहोचून आयोजकांना भेटतात. कार्यक्रमात उपस्थिती राहण्याची परवानगी घेतात. आजोबांची तळमळ बघून मग आयोजकही त्यांना परवानगी बहाल करतात. दिवसभर एखाद्या डेलिगेटप्रमाणे आजोबा कार्यक्रमात थांबतात. त्याच्या नोट्स काढतात.