आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'खटपट खोली'त विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना मिळतोय वाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलाकृती बनवताना विद्यार्थिनी. - Divya Marathi
कलाकृती बनवताना विद्यार्थिनी.
औरंगाबाद- "नकोच मजला पाटी-पुस्तक, अशी असावी शाळा, हसत-खेळत होई अभ्यास अन् पाठ पाढा, ना इतिहास ना भूगोल ना गणिताची आता चिंता...' या ओळी गाताना विद्यार्थी दिसले तर आश्चर्य वाटायला नको. पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या आणि रोचक पद्धतीने शिक्षण देण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी मुकुल मंदिर शाळेत "खटपट खोली' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत टाकाऊ वस्तूंपासून आकडे, अक्षरे, विविध प्रकारचे प्राणी तयार करण्याची कला शिकवली जाते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांत शिक्षणाची गोडीही निर्माण करण्यात यश आले आहे.
अभ्यास म्हटलं की सर्वांनाच कंटाळा येतो. त्यात गणित, इंग्रजी आणि इतिहास, भूगोल म्हटले की कपाळावर आठ्या पडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन वेगळ्या पद्धतीने त्यांना शिक्षण दिले जात आहे. अभ्यासाची भीती घालवण्यासाठी मुकुल मंदिर शाळेतील शिक्षकांनी निकालानंतर रद्दीत दिली जाणारी वह्या-पुस्तके, घरात फोडलेले नारळ, वह्यांचे पुठ्ठे, पालेभाज्यांच्या साली आणि घरातील कचऱ्याचा वापर करत विविध वस्तू तयार करायला लावल्या जातात. यासाठी शाळेत वेगळी खटपट खोलीच निर्माण करण्यात आली. "दिव्य मराठी'शी बोलताना मुख्याध्यापक सुरेश परदेशी म्हणाले की, सन २००० मध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला. पाठ्यपुस्तकातील धडे आणि कविता शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना पुठ्ठे, रद्दीचे कागद, नारळाची साल आदी वस्तूंच्या साहाय्याने विविध कलाकृती तयार करण्यास सांगितले जाते. या कलाकृती तयार केल्यामुळे एखादी कविता किंवा धडा यातील मुद्दे मुलांना चांगल्या प्रकारे कळतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांनाही वाव मिळतो. वस्तू तयार करता करता त्यांचा अभ्यासही होतो. या उपक्रमामुळे विद्यार्थीदेखील आनंदी असून पालकांचाही या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

हसत-खेळत शिक्षण
आज वाढती स्पर्धा आणि गुणवत्ता टिकवा असे सहज सांगितले जाते. परंतु या सर्व गोष्टींचा ताण मुलांवर पडतो. परिणामी बालपण विसरत ही मुले स्पर्धाच करत राहतात. त्यांचा सर्वांगीण विकास आणि कलागुणांना वाव मिळत नाही. त्यामुळेच त्यांच्या मनाचा विचार करत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हसत-खेळत शिक्षणाबरोरच गुणांना वाव देण्यासाठी ही खटपट खोली तयार केली आहे. जी मुलेच त्यांच्या मनाप्रमाणे सांभाळतात. सुरेशपरदेशी, मुख्याध्यापक.
असा होतोय फायदा
प्रामुख्याने मुलांना गणित, इंग्रजीची भीती अधिक वाटते. त्यासाठी आम्ही या खटपट खोलीच्या साहाय्याने कागदाचे, पुठ्ठयाचे तुकडे (कोलाज) चिकटवून पाढे, शब्द तयार करण्यास सांगतो. चित्र काढून रंगवण्यास सांगतो. यामुळे मुलांच्या लक्षातही राहते आणि भीतीही दूर होण्यास मदत होते. जयश्री शेळके, शिक्षिका.
काय आहे खटपट खोली ?
खटपट खोलीत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते. यात काड्याची पेटी, खडूपासून आकडे, अक्षरे, शब्द तयार करणे, टाकून दिलेल्या कपड्यांपासून फ्लॉवरपॉट तयार करणे, नारळाच्या शेंडीचा आणि कवटीचा वापर करत प्राणी तयार करणे आदी प्रकार शिकवले जातात.