आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Three day International Conference In Babasaheb Ambedar University

राजकारणावर स्थानिक नेत्यांचा अधिक प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्याच्या शहरी भागातील राजकारणावर स्थनिक नेते आणि नगरसेवकांचे नियंत्रण असल्यामुळे त्यांचा प्रभाव जास्त असतो. त्यामुळे तीच मंडळी वारंवार निवडून येत असते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. शैलेंद्र खरात यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उदारकला विभाग आणि अमेरिकेतील महाराष्ट्र स्टडीज ग्रुपतर्फे आयोजित "महाराष्ट्र : प्लेस अँड स्पेस' या विषयावरील तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी रविवारी (दि. १०) ते बोलत होते. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ अभ्यासक प्रा. जयंत लेले यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. या वेळी प्रा. सुहास पळशीकर, संयोजक डॉ. वि. ल. धारुरकर, समन्वयक डॉ. बिना सेंगर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी प्रा. शैलेंद्र खरात यांनी ‘पॉलिटिकल मोबिलायझेशन इन अनअर्बन लोकॅलिटी' या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या जवळपास निम्मी झाली आहे. त्यामुळे शहरी भागातील नेत्यांचा प्रभाव वाढला आहे. या वेळी प्रा. सुहास पळशीकर यांनी ‘महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई, विदर्भ विभागाचे स्थान' या विषयावर शोधनिबंध सादर केला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर वेगळ्या विदर्भाचा विषय अधिक चर्चिला गेला. तेलंगणा राज्य निर्मितीनंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. मुंबई विदर्भ या दोन्ही प्रश्नांत साधर्म्य आहे, असेही ते म्हणाले. या वेळी डॉ. बिना सेंगर यांनी ‘निजाम स्टेट अँड ट्रायबल वेल्फेअर' या विषयावर शोधनिबंध सादर केला. सकाळच्या सत्रात प्रा. वि. ल. धारुरकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. यात प्रा. अरुणा पेंडसे, विना नरंगल, प्रिया संगमेश्वरण यांनी भाग घेतला.

प्रा. वि. ल. धारुरकर यांनी ‘राजगड ते औरंगाबाद : दक्षिण पथावरील स्थित्यंतरे ' या विषयावर मार्गदर्शन केले. इतिहासाच्या संक्रमणात दक्षिण पथावरील स्थित्यंतरे होऊनही औरंगाबादचे महत्त्व अबाधित राहिले. सातवाहन काळ, मध्ययुग, औरंगजेबाच्या काळातही औरंगाबाद दक्षिण भारताचे प्रवेशद्वार बनले, असे ते म्हणाले. प्रा. संजय सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली ‘मायनॉरिटी अँड हेरिटेज स्पेशीज इन महाराष्ट्र’ या विषयावर परिसंवाद झाला. या वेळी वीरेंद्रपाल सिंग, रवींद्रकौर चिमा उपस्थित होते. तीन दिवसांत १० सत्रांत ३० शोधनिबंध सादर झाले.