आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक येथून गायब झालेल्या दोन मुली औरंगाबाद रेल्वेस्थानकावर सापडल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नाशिक येथून गायब झालेल्या दोन मुली औरंगाबाद रेल्वेस्थानकावर मंगळवारी रात्री आठच्या सुमारास सापडल्या. दोघींचे अपहरण झाल्याची नोंद नाशिक येथील भद्रकाली पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या दोघी जनशताब्दी एक्स्प्रेसने औरंगाबाद रेल्वे स्थानकावर येताच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. प्रियंका विनोद घोगरे (१५) आणि निकिता विनोद घोगरे अशी त्या बहिणींची नावे आहेत. नाशिकमधील भगवतीनगर, टाकळी रोड परिसरातील ४५ क्वार्टर्स येथे त्या राहतात.
नाशिक येथील दोन मुलींचे अपहरण झाल्याची माहिती व्हॉट्सअॅपवर फिरत होती. या दोन्ही मुली जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये असल्याची माहिती महिला चार्ली सुप्रिया सुळे, िहना पठाण, अनिता दांडगे, सरला नरवडे, संगीता बडगुजर, रिवीता पवार, निर्मला सुपारे यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा, विशेष शाखा, महिला चार्ली अशा १०० पोलिसांचा ताफा संध्याकाळी ७.३० च्या सुमारास रेल्वेस्थानकावर पोहोचला. जनशताब्दी स्थानकावर थांबताच सर्व पोलिस रेल्वेच्या डब्यात चढले आणि त्या मुलींचा शोध सुरू झाला. जनरल डब्यात त्या दोन्ही मुली आढळून आल्या. पोेलिसांनी त्यांना ताब्यात घेत याची माहिती भद्रकाली पोलिस ठाण्याला कळवली. पोलिसांनी या मुलींना जेवण दिले. भद्रकाली पोलिस ठाण्याचे एक पथक या मुलींना घेण्यासाठी औरंगाबादला निघाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या वेळी पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक प्रशांत आवारे आणि त्यांचे पथक उपस्थित होते.
स्टेशनवर भीतीचे वातावरण
अचानकएवढा मोठा फौजफाटा रेल्वे स्थानकात का दाखल झाला, मोठी घटना घडली की काय म्हणून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. कुणी मंत्री येतो की काय? की अतिरेकी पकडण्यासाठी एवढे पोलिस जमले, अशी चर्चा प्रवाशांमध्ये होती.