औरंगाबाद - नोकरी लावून देतो म्हणून भामट्याने एका तरुणाचे तीस हजार रुपये लुबाडले. फसवणूक झाल्यानंतर चार महिने पोलिस ठाण्यात चकरा मारूनही फायदा झाला नाही. अखेर "दिव्य मराठी'ने तरुणाची व्यथा मांडली. बातमी पाहून फसवलेल्या तरुणाच्या नातेवाइकांनी त्याची भेट घेऊन माफी मागत पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. पैसे परत मिळतील ही आशा मी सोडून दिली होती. मात्र, "दिव्य मराठी'च्या बातमीमुळे माझ्या कष्टाचे पैसे परत मिळत असल्याची भावना शामराव डोंगरदिवे (रा. बायजीपुरा) याने व्यक्त केली.
महानगरपालिकेत नोकरी लावून देताे, अशी थाप मारून अमोल पैठणे याने शामरावकडे ३० हजार रुपयांची मागणी केली. नोकरी लागणार म्हणून त्याने हॉटेलवर काम करून जमवलेले पैसे त्याला दिले होते. त्याने जिन्सी ठाण्यात अमोलच्या विरोधात तक्रार अर्ज दिला. चार महिने उलटूनही पोलिसांनी दखल घेतल्यामुळे शामरावने "दिव्य मराठी' कार्यालयात येऊन व्यथा मांडली. पोलिसांकडे दिलेला तक्रार अर्जही दाखवला. १२ जानेवारी रोजी फसवणूक झाल्याची बातमी प्रकाशित झाली.
ही बातमी अमोलच्या मामांनी पैठण येथे वाचली आणि शामरावला फोन केला. अमोलचे वडील, मामा, काही नातेवाईक, नगरसेवक यांनी अमोलला शामरावच्या समोर उभे केले आणि माफी मागण्यास सांगितले. अमोलच्या घरची परिस्थितीदेखील बिकट असून त्याचे वडील सेवानिवृत्त झाले आहेत.
मी आशा सोडली होती
^पैसे परत मिळतील ही आशा सोडली होती. फसवणाऱ्या तरुणाचा माझ्याकडे फोटो नव्हता. त्यामुळे त्याला कुठे शोधावे हे कळत नव्हते. पोलिसांनीदेखील माझी तक्रार गांभीर्याने घेतली नव्हती. आई-वडिलांना कसे तोंड दाखवावे हे कळत नव्हते. अखेर मी माझी व्यथा "दिव्य मराठी'कडे मांडली. पोलिस जे करू शकत नाहीत ते प्रसारमाध्यम करू शकतात याची जाणीव झाली. - शामराव डोंगरदिवे, तक्रारदार