आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Young Man On The End Of Sangramanagara Flyover

संग्रामनगर उड्डाणपुलावर युवकाचा बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-राज्य रस्ते विकास महामंडळाने 28 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या संग्रामनगर उड्डाणपुलाने पहिला बळी घेतला. पुलावरून शहानूरवाडीकडे (एकता चौक) जाताना दुचाकीवरील ताबा सुटून एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थी अक्षत रजनीश शर्मा (22, रा. चंदिगड) जागीच ठार झाला. सोमवारी (तीन फेब्रुवारी) पहाटे तीनच्या सुमारास हा भयंकर अपघात झाला. पुलाचा उतार संपताना दुभाजक नाही आणि त्यापुढे धोकादायक वळणासह अचानक दुभाजक सुरू झाल्याने या युवकाला त्याचा अंदाज आला नाही, असा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे.
एमआयटी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकणारा अक्षत रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास संग्रामनगर उड्डाणपुलावरून शहानूरमियाँ दग्र्याकडे येत होता. उड्डाणपुलावरून खाली उतरत असताना त्याची भरधाव दुचाकी (एमएच 20 सीक्यू 0143) शहानूरमियाँ दर्गा कमानीपासून सुमारे 150 फूट अंतरावर असलेल्या दुभाजकावर आदळली. त्याने ब्रेक दाबून सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगावर नियंत्रण ठेवणे त्याला शक्य झाले नाही. तो जवळपास 20 फुटांपर्यंत दुचाकीसह फरपटत गेला. त्याचे डोके दुभाजकावर जोरात आदळले आणि तत्क्षणी मृत्यू झाला.
दहा मिनिटे त्याच अवस्थेत
मध्यरात्र उलटून गेली असल्याने पुलावर वाहतूक नव्हती. आजूबाजूच्या घरांतील लोकही निद्राधीन झाले होते. त्यामुळे अक्षत मृतावस्थेत दहा मिनिटे तसाच पडून होता. याच दरम्यान उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे रात्रीचे गस्तीपथक शहानूरवाडीकडून सातार्‍याकडे निघाले होते. त्यातील जमादार संजय देशमुख यांना एक दुचाकी रस्त्यावरच पडली असल्याचे दिसले. त्यांनी मोबाइल व्हॅन वळवली. तेव्हा त्यांना अक्षत निपचीत पडल्याचे दिसले. तेथे रक्ताचे थारोळे साचले होते. त्यांच्या सहकार्‍यांनी अक्षतला उचलून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याच्या आयुष्याची दोरी त्याआधीच तुटलेली होती.
पोलिसांनी अक्षतच्या मोबाइलवरूनच त्याच्या घरच्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार नातेवाईक चंदिगड येथून मुंबई आणि तेथून औरंगाबादला विमानाने आले. सायंकाळी ते अक्षतचा मृतदेह घेऊन गेले.
पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट
मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यापूर्वी पोस्टमॉर्टेम करण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतर अक्षतच्या डोक्याला नेमक्या कोणत्या ठिकाणी मार लागला होता. दुचाकी चालवताना तो नेमक्या कोणत्या अवस्थेत होता याचा उलगडा होईल, असे तपास करणारे संजय देशमुख यांनी सांगितले.
सेलिब्रेशनवर शोककळा!
अक्षतच्या एका मित्राचा दोन फेब्रुवारीला वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी वस्तूंची खरेदी करण्यासाठी उस्मानपुर्‍याकडे निघाला होता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच वाढदिवसाच्या पार्टीवर शोककळा पसरली.
मुनीश शर्मा यांचा पुतण्या
मृत अक्षत एमआयटीचे महासंचालक मुनीश शर्मा यांच्या चुलतभावाचा मुलगा होता. पहाटे पोलिसांनी अपघाताची माहिती दिल्यावर त्यांनाही जबर धक्का बसला. आमच्या कुटुंबातील एक धडपडे व्यक्तिमत्त्व आम्ही गमावले, अशा शब्दांत त्यांनी दु:ख व्यक्त केले.