आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलावात बुडून युवकाचा मृत्यू, दोन तासांनंतर शाळकरी मुले पोहू लागली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर दोनच तासांनी तलावात अनेक तरुण मुले पोहताना दिसली. या ठिकाणी केवळ धोक्याची सूचना देण्याचे फलक लावण्यापलीकडे महापालिकेने सुरक्षिततेसंबंधी कोणतीही उपाययोजना केली नाही. योगेश राजेंद्र गायकवाड (रा. महात्मा फुले हाऊसिंग सोसायटी, जटवाडा रोड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
योगेश आणि त्याचे तीन मित्र शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हर्सूल तलावात पोहण्यासाठी गेले होते. बाराच्या सुमारास त्याचे मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र योगेशला पोहता येत नव्हते. म्हणून तो काठावरच पाणी खेळत होता. अनवधानाने थोडा पुढे गेला आणि तलावात गाळ आणि मुरूम काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात फसला. मित्रांनी त्याला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्यांना यश आले नाही. मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि हर्सूल ठाण्याचा फौजफाटाही घटनास्थळी पोहोचला. अग्निशमन विभागाच्या जवानांनी अर्ध्या तासात मृतदेह बाहेर काढला. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार योगेशचे वडील राजेंद्र हे कटलरी सामानाची हातगाडीवर विक्री करतात, तर आई एका खासगी दवाखान्यात शिपाई म्हणून काम करते. त्याला एक लहान भाऊ बहीण आहे. योगेश करमाड येथील राजीव गांधी महाविद्यालयात १२ वीत शिकत होता. हर्सूल पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक नामदेव जाधव करत आहेत.

घटनेनंतरही पोहणाऱ्यांची गर्दी
हर्सूल तलावात बुडून मृत्युमुखी पडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र प्रशासनाने धोक्याची सूचना देणारे फलक लावण्यापलीकडे कुठलीही खबरदारी घेतली नाही. योगेशचा बुडून मृत्यू झाल्यानंतर ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने दुपारी चारच्या सुमारास घटनास्थळाची पाहणी केली. तेथे शाळकरी मुले पाण्यात खेळताना दिसली. या प्रतिनिधीने त्यांना बाहेर येण्याची विनंती केली. तेथे सुरक्षा रक्षकही नव्हता. एवढ्या घटना घडूनही तेथे पोहण्यास मज्जाव केला जात नाही. पहाटे फिरायला आलेले तरुणही पोहतात. दररोज अशाच प्रकारे येथे मृत्यूशी खेळ सुरू असतो, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.
बातम्या आणखी आहेत...