आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Young Man's Murder On Sai Tekadi In Aurangabad

तरुणाचा खून; मृतदेह साई टेकडीवर फेकला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - धारदार गुप्तीने गळा चिरल्यानंतर पोटावर आणि छातीवर वार करून २२ वर्षांच्या तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. चिकलठाणा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी तपासात बाळू लांडगे (१९) रा. अंबिकानगर, मुकुंदवाडी असे नाव पुढे आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक प्रिया थोरात यांनी सांगितले, देवळाली गावापासून अंदाजे चार किमी अंतरावर वन विभागाच्या जंगलात मृतदेह असल्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. साई टेकडीच्या अलीकडील एका छोट्या टेकडीवर मृतदेह पडून होता. मृताच्या अंगात जीन्स पँट आणि काळा टी शर्ट असून त्यावर ‘शिवजयंती उत्सव हिवाळे ग्रुप' असे लिहिलेले आहे. त्याच्या गळ्यात इंग्रजी अक्षरे असलेला बिल्ला आहे. त्यावर नेम, बर्थ, अॅड्रेस आणि ब्लड ग्रुप असा उल्लेख आहे. खिशात हेडफोन चुन्याची डबी, तंबाखूची पुडी सापडली. पोलिसांनी या भागातील नागरिकांना मृतदेह दाखवला; पण सायंकाळपर्यंत ओळखू पटू शकली नव्हती. मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत नेण्यात आला. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक डाॅ. कांचनकुमार चाटे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अरुण केंद्रे, महेश आंधळे, गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळाची कसून पाहणी केली.

माहिती द्यावी
या मृतदेहाच्या बाबतीत कुणालाही काही माहिती असेल तर पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा. यासंबंधी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. - नवीनचंद्र रेड्डी, पोलिसअधीक्षक, ग्रामीण

साताऱ्यातील मृतदेहाची ओळख अजून पटली नाही
दोन ते तीन महिन्यांपूर्वी सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंदोन-भिंदोन टेकडीवर अशाच प्रकारचा मृतदेह सापडला होता. मात्र हा मृतदेह पूर्णपणे कुजला होता. त्याच ठिकाणी सातारा पोलिसांनी त्याचे शवविच्छेदन केले होते. मात्र तो मृतदेह कुणाचा हे शोधण्यात सातारा पोलिसांना यश आले नाही.

रक्त सांडलेले नाही
ज्या ठिकाणी हा मृतदेह सापडला त्या ठिकाणी कुठलेही रक्त सांडलेले नाही. अंगावर इतक्या जखमा असूनदेखील त्या ठिकाणी रक्त सांडले नव्हते. त्यामुळे हा खून टेकडीवर केला आहे की मृतदेह आणून टाकण्यात आला, हा पेच पोलिसांपुढे निर्माण झाला आहे. तीन दिवसांपासून हा मृतदेह या टेकडीवर असावा, असा संशय पोलिसांना आहे. सोमवारी या भागात मृतदेह असल्याची चर्चा होती. मात्र रात्र असल्यामुळे पोलिसांना त्याची खात्री करता आली नाही. थंडीमुळे मृतदेहातून दुर्गंधी सुटली नाही.