आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्याला वाटा कमी मिळाला अन् सापडली तपासाची वाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दोन घरांची इत्थंभूत माहिती दिली. वेळापत्रकानुसार पूर्ण प्लॅनिंग करून दिले. त्या मोबदल्यात मला फक्त साडेसहा हजार रुपये कसे, या प्रश्नाचा भुंगा त्याच्या डोक्यात फिरू लागला. त्याने ही बाब त्याच्या काही आप्तांजवळ बोलून दाखवली आणि पाहता पाहता ती खबऱ्यांमार्फत पोलिसांकडे पोहोचली. अन् दशमेशनगर येथील मुखर्जी, बरडिया यांच्या घरात झालेल्या लुटीच्या घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी चोरट्यांची टोळी सोमवारी गजाआड केली.

१४ ऑक्टोबर रोजी दशमेशनगर येथील शांतगंगा अपार्टमेंटमध्ये राहणारे आर्किटेक्ट दिब्येंदू मुखर्जी आणि १५ रोजी शांतगंगा लगतच्या बंगल्यात एकटेच राहणारे सेवानिवृत्त बँक अधिकारी मिश्रीलाल बरडिया यांच्याकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. दोघांकडून सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज लुटला. (प्रत्यक्षात दहा लाखांचा ऐवज असल्याचे सांगण्यात येते.) मुखर्जी यांच्या घरी भर दिवसा तर बरडियांकडे भल्या पहाटे चोरटे शिरले होते. दशमेशनगर या वर्दळीचा भाग असूनही तेथे हा प्रकार घडल्याने पोलिस चक्रावून गेले होते. प्रारंभी मुखर्जी, बरडिया तपासात सहकार्य करत नसल्याची तक्रार होती. दिव्य मराठीने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यावर मुखर्जी, बरडियांनी चोरट्यांचे वर्णन, चोरीस गेलेल्या ऐवजाची बिले सादर केली. त्यामुळे तपासाला गती मिळाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही घरफोड्यांची आखणी बरडिया यांच्याकडे काम करणाऱ्या मोलकरणीचा नवरा विनोद गायकवाडने केली होती. मुखर्जी, बरडियांकडे कोणत्या चीजवस्तू आहेत, रोख रक्कम कुठे ठेवलेली असते, कोणत्या वेळी मुखर्जी एकटे असतात, अशी सर्व माहिती त्यानेच अंबाजोगाई आणि औरंगाबादेतील चोरट्यांना दिली.

औरंगाबादेतील चोरटे भरत उर्फ चिंठ्या गिरीश मेहता (२३, रा. श्रीकृष्णनगर, गारखेडा), प्रवीण उर्फ पऱ्या साहेबराव राठोड (२३, रा. अजिंक्यनगर, प्लॉट क्रमांक १५-बी, गारखेडा) यांनी मुखर्जींच्या घरात सेल्समनच्या वेशात प्रवेश करून लुटालूट केली. तर अंबाजोगाईच्या टोळीने बरडियांना लुटले. मिळालेल्या ऐवजातील किमान २५ टक्के वाटा मिळाला पाहिजे, अशी विनोदची अपेक्षा होती. मात्र, त्याच्या हातावर फक्त साडेसहा हजार रुपये टिकवण्यात आले.

सीसीटीव्हीचे फुटेज तपासले
शांतगंगा अपार्टमेंटजवळ असलेल्या बँकेच्या सीटीटीव्ही फुटेजमध्ये बरडियांच्या घराजवळ १५ ऑक्टोबर रोजी पहाटे दोन संशयित इसम दिसत होते. त्याची पोलिसांनी चांगली मदत झाली. याशिवाय मुखर्जी, बरडिया यांनी केलेली चोरट्यांची वर्णनेही महत्वपूर्ण ठरली. त्या आधारे उस्मानपुरा पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने टोळी जेरबंद केली. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक उन्मेश थिटे, राहुल खटावकर, अनिल वाघ, नितीन आंधळे, नसीम खान, शेख आरेफ, शिवाजी झिने, नितीन मोरे, सुधाकर राठोड, दत्तात्रय गडेकर, सुरेश कळवणे, श्रीराम राठोड, मनोज चव्हाण, अशोक नागरगोजे, लालखाँ पठाण, शेख जावेद, विशाल सोनवणे, रवींद्र दाभाडे, प्रभाकर राऊत, शिवाजी भोसले, बबन इप्पर, मुक्तेश्वर लाड, शेख एजाज यांनी केली. उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अमोल देशमुख या प्रकरणाचा तपास करीत होते. पोलिस आयुक्तांनी या पथकांना एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

चोरट्यांच्या टोळीतील सगळेच सराईत
चोरट्यांच्या टोळीतील सर्वजण पंचविशीच्या आतील आहेत. त्यात अंबाजोगाईचे नंदू शिरसाठ, गोरख खळेकर, सूर्यकांत श्रीराम मुळे, राजू कळसे, पांडू कचरे यांचा समावेश आहे. यातील प्रवीण, नंद आणि गोरख २०१२ मध्ये झालेल्या छावणी येथील सामूहिक बलात्कारातील आरोपी आहेत. दोन्ही घरफोड्यांचा मास्टरमाईंड विनोद गायकवाड बुलडाणा येथून तडीपार तर राजू कळसे लातूर येथे एका गुन्ह्यात अटक आहे. गोरख सध्या नवी मुंबईतील एका प्रतिष्ठित वकिलाच्या घरी कामाला होता. त्याला तेथून अटक करण्यात आली.

नोकर नियुक्त करताना आधी चारित्र्य पडताळणी करून घ्या
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी विविध ठिकाणी घरकामाला होेते. शहरात गेल्या काही महिन्यात झालेल्या घरफोड्या आणि चोऱ्यांमध्ये घरातील नोकरांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात गोलवाडी दरोडा, ज्येेष्ठ साहित्यिक प्रभाकर मांडे यांच्या बँकेतील लॉकरमधील २२ तोळे सोन्याची चोरी आणि दशमेशनगरमधील घटनांचा समावेश आहे. ही बाब लक्षात घेऊन घरकामासाठी नोकर ठेवताना त्यांचे पोलिस रेकॉर्ड तपासा. शहर पोलिसांनी तयार केलेल्या संकेत स्थळावर जाऊन आपण नोकरीसाठी ज्या व्यक्तीला ठेवतो आहे. त्याचे नाव टाकल्यावर त्याचे रेकॉर्ड तपासता येईल, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.