आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान...! दिवसा ढवळ्याही तुमच्या घरात होऊ शकते चोरी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घराला कुलूप लावून आपण गावाला जात असाल तर सावधान. कारण रात्रीच चोर चोरी करून जातात हा गैरसमज दूर करा. गेल्या दोन दिवसांत घरफोड्यांनी विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दिवसाढवळ्या तसेच पहाटे पाच घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पत्नीला रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचे घर फोडून तीन तोळ्यांचे पेंडल आणि कानातील रिंग चोरून नेली. तर सेलू येथे गेलेल्या मजुराचे घर शनिवारी पहाटे फोडले. शुक्रवारी मध्यरात्री सिडको, एन-८ मधील चंद्रकांत चौधरी हे बाहेरगावी गेल्याचे पाहून चोरांनी त्यांचे घर फोडले.
पुंडलिकनगर पोलिस ठाणे
शिवाजी नगररोडवरील एम्ब्रॉल्ड सिटीमधील शिक्षक नंदकिशोर काळुजी पाटील (रा. एकदंत अपार्टमेंट) हे पिंपळगाव पांढरी येथील एका शाळेत कार्यरत आहेत. शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलाला नाशिक येथे जायचे असल्याने पाटील त्यांना जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये बसवून देण्यासाठी गेले होते. पाटील घराबाहेर पडल्याचे पाहून चोराने त्यांच्या घराची कडी तोडून तीन कपाटे फोडली. त्यातून तीन तोळ्यांचे पेंडल आणि कानातील रिंग असा ऐवज चोरून नेला. हा प्रकार सकाळी साडेसहाच्या सुमारास घरी परतलेल्या पाटील यांच्या लक्षात आला. यानंतर त्यांनी घटनेची माहिती पुंडलिकनगर चौकीतील पोलिसांना कळवली. पोलिस निरीक्षक अनिल आडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली.
अपार्टमेंटमधील सुरक्षारक्षकाची पत्नी साफसफाई करत असताना पहाटे टी-शर्ट आणि जिन्स पँट परिधान केलेला एक तरुण आत शिरल्याची माहिती पोलिसांना कळाली. दरम्यान, पाटील यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. श्वानाने काही अंतरावपर्यंत चोराचा माग काढला. तसेच ठसे तज्ज्ञांनीही चोराच्या हाताच्या ठशांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

जिन्सीपोलिस ठाणे
परभणी जिल्ह्यातील सेलू येथे गेलेल्या अब्दुल हादी अब्दुल सिद्दीकी (४५, रा. गल्ली क्र. ४, भवानीनगर, बायजीपुरा परिसर) यांचे मध्यरात्री घर फोडून कपाटातील ३५ हजारांची रोकड आणि सुमारे एक लाखांचे दागिने असा एक लाख ३५ हजारांचा ऐवज चोरीस गेला. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार शेजाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी घटनेची माहिती हादी यांना कळवल्यानंतर त्यांनी औरंगाबादला धाव घेतली. जिन्सी ठाण्याचे निरीक्षक शामसुंदर वसूरकर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान नैनाने चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

जिन्सी परिसरातीलच राजेंद्र नामदेवराव लांडगे (४७, गल्ली क्र. ३, दत्तनगर) हे शुक्रवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास पत्नीसह मॉर्निंग वॉकला गेले होते. तेव्हा एका तासांतच चोराने लांडगे यांच्या घराचे कुलूप तोडून मोबाइल आणि साडेतीन हजारांची रोकड असा साडेदहा हजारांचा ऐवज चोरून नेला.

हर्सूल पोलिस ठाणे
शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास सुरेवाडीतील विजय गाढवे (३६, रा. प्लॉट क्र. ७५) यांच्या पत्नी शेजाऱ्याची तब्बेत खराब असल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेल्या होत्या. ही संधी साधून चोराने त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल आणि रोख दोन हजार असा १९ हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार सायंकाळी पावणेसातच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
घरफोडीच्या तपासासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...