आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आधी चोरट्यांनी शेजाऱ्यांकडून माहिती घेतली, मग फ्लॅटमध्ये शिरून वृद्धेच्या गळ्यावर चाकू लावत मंगळसूत्र हिसकावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आकाशवाणी केंद्रामागील मित्रनगर भागात शुक्रवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास ६३ वर्षीय महिलेच्या गळ्यावर चाकू लावत मंगळसूत्र हिसकावण्याची घटना घडली. २० ते २२ वर्षांच्या दोन चोरट्यांनी आधी ही महिला राहत असलेल्या िवनया अपार्टमेंटमधील शेजाऱ्यांकडे बाजूच्या विंगमध्ये पाटील आजी-आजोबा कुठे राहतात, अशी चौकशी केली. शेजाऱ्यांनी सखोल चौकशी करता त्यांना फ्लॅट दाखवून दिला. त्यानंतर त्यांनी डोअर बेल वाजवल्यावर या महिलेने जाळीचे आणि मुख्य दार उघडले. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे हिसकावून घेत पळ काढला. विद्या सर्जेराव पाटील असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती.
शुक्रवारी सकाळी पाटील एकट्याच घरी होत्या. त्यांचे पती सर्जेराव एका नातेवाइकाच्या मुलाला दवाखान्यात घेऊन गेले होते. यावर नजर ठेवून असलेले चोरटे अपार्टमेंटमध्ये शिरले आणि त्यांनी इथे एक आजी-आजोबा राहतात. त्यांचा फ्लॅट नेमका कुठला आहे, अशी शेजाऱ्यांकडे चौकशी केली. शेजाऱ्याने माहिती दिल्यावर ते पाटील यांच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटवर पोहोचले. पाटील यांनी दोन्ही दरवाजे उघडून काय काम आहे, असे विचारले. तेव्हा चोरट्यांनी आम्हाला पाटील साहेबांनी कामासाठी पाठवले असल्याचे सांगितले. मग पाटील यांनी या दोघांनाही घराबाहेर थांबा, असे म्हटले त्या दरवाजे उघडे ठेवूनच पाटील यांना फोन करण्यासाठी आत गेल्या. तेवढ्यात या चोरट्यांनी घरात प्रवेश करत पाटील यांच्या गळ्याला चाकू लावला आणि मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर त्यांनी गळ्यावरचा चाकू दूर करताच पाटील यांनी आरडाओरड सुरू केली. ते पाहून चोरट्यांनी पळ काढला. शेजाऱ्यापाजाऱ्यांनी पोलिसांना माहिती कळवताच जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि त्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सर्जेराव पाटील एपीआय कंपनीतून, तर विद्या पाटील उस्मानपुरा येथील शिशुविकास केंद्र शाळेतून शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचा मुलगा अमोल इंदूर येथे एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून काम करतो, तर मुलीचे लग्न झाले असून ती दमण सिल्वासा येथे राहते. त्यामुळे पाटील पती-पत्नीच या घरात राहतात याची माहिती चोरट्यांनी मिळवली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. अपार्टमेंटला सीसीटीव्ही किंवा सुरक्षा रक्षक नसल्याचे निदर्शनास आले.

बँकेतून दागिने घरात
दसरा आणि दिवाळीच्या काळात अनेक जण बँकेत ठेवलेले दागिने घरी आणतात. त्यामुळे घरफोडीचे प्रमाण वाढते. शिवाय अनेक घरातील तरुण सहलीसाठी जातात. ज्येष्ठ नागरिक एकटेच घरात राहतात. याचाही फायदा चोरटे घेतात.

दवाखाना, हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे
या भागात असलेल्या एक दवाखाना आणि हॉटेलच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे पळून जाताना दिसले आहेत. त्यांनी काळ्या रंगाचे शर्ट घातल्याचे दिसत असल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ज्येष्ठ नागरिक टार्गेट
यापूर्वी नूतन कॉलनी, उस्मानपुरा, समर्थनगरात ज्येष्ठ नागरिकांच्या घरात घसून अशा प्रकारे लूटमारीचे प्रकार झाले आहेत. पेन्शन किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या विविध योजनांची माहिती द्यायची आहे, असे सांगून हे भामटे घरात घुसतात.

फक्त फ्लॅटना ग्रीलचे दरवाजे
दिव्य मराठी प्रतिनिधीने विनया अपार्टमेंटची पाहणी केली. तेेथे २४ फ्लॅटची मिळून एक विंग आहे. त्यापैकी आठ फ्लॅटला ग्रीलचे (लोखंडी जाळी) दरवाजे आहेत. पाटील यांच्या घरालादेखील ग्रीलचा दरवाजा आहे. मात्र, पाटील यांनी दोन्ही दरवाजे सताड उघडल्याने चोरट्यांना आत शिरणे सहज शक्य झाले.

खात्री झाल्याशिवाय ग्रीलचा दरवाजा उघडू नका
पोलिसांचे आवाहन : अनोळखी व्यक्ती आल्यानंतर त्यांची संपूर्ण चौकशी करून खात्री पटल्याशिवाय ग्रीलचा दरवाजा उघडू नये. अपार्टमेंटमध्ये येणाऱ्याची कसून चौकशी करावी. मगच इतर फ्लॅटधारकांबद्दल माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले.
बातम्या आणखी आहेत...