आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मामा-भाच्यास लुटणाऱ्या दरोडेखोरांना रंगेहाथ पकडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पुंडलिकनगर रस्त्यावर दोघांना लुटणाऱ्या टोळीला मुकुंदवाडी पोलिसांनी शुक्रवारी पहाटे (२९ ऑगस्ट) रंगेहाथ पकडले. तिघेही सराईत दरोडेखोर असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून जप्त केलेल्या दोन दुचाकी चोरीच्या आहेत, असा पोलिसांचा संशय आहे.
मुकुंदवाडी ठाण्याचे कॉन्स्टेबल व्ही. बी. लिपाणे आणि एस. बी. बहुरे हे दोघे पुंडलिकनगर-जयभवानीनगर येथे गस्तीवर होते. शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास हॉटेलमध्ये काम करणारे राहुल कडुबा लोखंडे (२८, रा. भोकरदन) आपल्या मामासह सायकलने जयभवानीनगरकडे जात होते. तेव्हा दोन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांची सायकल अडवून खिशातील अडीच हजार रुपये हिसकावले. लूटमार करणाऱ्यांना विरोध करणाऱ्या राहुल व त्यांच्या मामाचा आरडाओरडा एेकल्यानंतर पेट्रोलिंग करणारे बीट मार्शल लिपाणे आणि बहुरे घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांना पाहताच तिघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, लिपाणे आणि बहुरे यांनी त्यांच्या मुसक्या आवळून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात आणले, शिवाय दोन्ही दुचाकीही हस्तगत केल्या. दत्ता दादाराव धोत्रे (३५, रा. न्यायनगर), सतीश नामदेवराव दुधर्डे (२८, रा. गणेशनगर) आणि दीपक प्रकाश राठोड (२२, रा. विश्रांतीनगर) अशी त्या दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दरोडा (३९२) घातल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला
आहे. पोलिस निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दिनेश सोनवणे तपास करत आहेत.
आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
एमएच २० बीआर ८२९७ आणि एमएच २० सीके ७८४८ या क्रमांकाच्या दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. दोन्ही दुचाकी चोरीच्या असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरोडेखोरांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.