आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल लुटणाऱ्या भामट्यांना अवघ्या दोन मिनिटांत पकडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समर्थनगर येथील लासूर अर्बन बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या युवकाला अडवून त्याच्या जवळचे दोन मोबाइल हिसकावणाऱ्या दोघांना अवघ्या दोन मिनिटांत पोलिसांनी पकडले. सोमवारी (२५ ऑगस्ट) दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. क्रांती चौक पोलिस कॉलनीतून जाताना त्यांच्या गाडीला अपघात झाल्यामुळे ‘ते’ चोर असल्याचे उघड झाले. दोघांनाही त्वरित अटक केली असून त्यांच्या विरोधात दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज रामदास राऊत हा युवक भोला वडापाव सेंटरसमोर आल्यानंतर फिल्मी स्टाइलने त्याच्यासमोर दुचाकीस्वारांनी यामाहा कंपनीचे (एमएच-२०, १५ पी-९८९३) वाहन उभे केले. त्याला धमकावून त्याच्या जवळील दोन मोबाइल हिसकावले. त्यानंतर धूम ठोकत दुचाकीस्वार क्रांती चौक पोलिस ठाण्याच्या दिशेने गेले. पोलिस कॉलनीजवळील एका अॅक्टिव्हाला त्यांची यामाहा धडकली. अॅक्टिव्हा आणि दुचाकीस्वारांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू झाले. चूक कुणाची, राँग साइड कोण आले असा वाद सुरू असताना थोड्याच वेळात मोबाइल गेलेला युवक मनोज क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार करण्याच्या उद्देशाने आला. त्या वेळी जमलेली गर्दी बघण्यासाठी मनोज गेला असता त्याने त्या दोन चोरांना ओळखले. त्यामुळे मनोजसह बघ्यांनी दोन्ही चोरट्यांना बेदम चोप देण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्यांनी खिशातून पळवलेले मोबाइल काढून अॅक्टिव्हा चालकाच्या हवाली केले, अन् सोडून देण्याची विनंती करू लागले.

पोलिसाच्या दुचाकीला धडक
अॅक्टिव्हाचालक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी रामचंद्र क्षीरसागर निघाले. त्यामुळे त्यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून दोन्ही भामट्यांना क्रांती चौक पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर मनोजच्या तक्रारीनुसार दोघांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. भामट्यांची नावे मिथुन धर्मा चव्हाण आणि सचिन चव्हाण अशी असून त्यांना पोलिस कोठडीत डांबण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर दोघांचीही चौकशी करत असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.