आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरटयांनी घातला धुमाकूळ, एकाच दिवशी दोन घरफोड्या, सुमारे लाखांचा ऐवज लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातघरफोड्यांचे सत्र सुरूच असून शहरात एकाच दिवशी दोन घरफोड्यांतून तब्बल तीन लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. यातील पहिली घटना जवाहरनगर भागात सकाळी साडेअकरा वाजता, तर दुसरी घटना सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या छत्रपतीनगर भागात सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली.

गादिया विहार येथील सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील रहिवासी तेरेस नायनल लोबो (२०) यांचे घर सकाळी अकराच्या दरम्यान फोडून सोने-चांदी आणि रोख रकमेसह साठ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. मंगळवारी तेरेसचे वडील नायनल लोबो आजारी असल्याने त्यांना अॅम्ब्युलन्सद्वारे काल्डा कॉर्नर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याने घरातील सर्व जण दवाखान्यात गेले होते. यादरम्यान त्यांचा मुलगा तेरेस लोबो सकाळी साडेअकरा वाजता घरी आला असता घराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती तेरेसने बुधवारी सायंकाळी पोलिसांना दिली. यावरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार कैलास काळे तपास करत आहेत.

दुसरी घटना सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील छत्रपतीनगरात घडली. विक्रम प्रकाश रायसोनी यांचे घर फोडून ५० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, २४ हजार रुपयांचा सोन्याचा हार, ३० हजार रुपयांची सोन्याची साखळी, ३४ हजार ५०० रुपयांची सोन्याची अंगठी, २५ हजार रुपयांचे कानातले झुंबर, ३५ हजार रुपयांच्या सोन्याच्या चार अंगठ्या, हजार रुपयांचे चांदीचे कडे, ५६ हजार ५०० रुपयांच्या महिला लहान मुलांच्या अंगठ्या, हजार रुपयांचे चांदीचे पैंजण, १५ हजार रुपयांच्या रोख रकमेसह तब्बल दोन लाख चाळीस हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. रायसोनी यांचे बीड बायपास भागात मेडिकलचे दुकान आहे. सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान रायसोनी दांपत्य घराला कुलूप लावून मेडिकलवर गेले होते. रात्री साडेनऊ वाजता रायसोनी दांपत्य घरी आले, त्या वेळेस त्यांच्या घराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. चोरांनी चोरी करून मागील दाराने पळ काढल्याचे दिसून आले. यावरून त्यांनी सातारा पोलिसांना या घटनेची माहिती कळवली. सातारा ठाण्याचे फौजदार रवींद्र बागूल यांनी घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.