आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉवरखाली अंघोळीचा नाद महागात पडला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बंगला नसला तरी बंगल्यात लावल्या जाणाऱ्या शॉवरखाली किमान अंघोळ करता यावी, असा हट्ट बायकोने केला. तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी नवऱ्याने दुकान फोडले आणि शॉवरसह अन्य किमती साहित्य लांबवले. मात्र, पोलिसांनी तीन तासांतच मुद्देमालासह आरोपीला पकडले, तर चोरीत सहभागी असलेली त्याची बायको आई फरार झाली आहे. ही घटना बीड बायपास परिसरात घडली.

गारखेड्यातील सूतगिरणी जवळील इंदिरानगरमधील शेख अरफाक शेख आरिफने देखण्या युवतीशी चार वर्षांपूर्वी लग्न केले. लग्नानंतर सर्व सुख सुविधा मिळाव्यात, असा तिने हट्ट धरला. बायकोच्या हट्टापुढे शेख अरफाकने तिला हवे ते देण्यासाठी मार्ग अवलंबला तो चोरीचा . यापूर्वी अनेक चोऱ्यांत यश आल्याने १२ एप्रिलच्या मध्यरात्री बीड बायपास रोडवरील गोदावरी ट्रेडर्स फोडले आणि बायको आईलाही सहभागी करून घेतले.
दुकानाचे मालक महंमद अब्दुल हकीमखान यांनी चोरीची कल्पना सातारा पोलिसांना दिली. पोलिस उपनिरीक्षक शेख निसार यांच्यासह सतीश हंबर्डे, राजेंद्र साळुंके, संदीप तायडे, रमेश सांगळे, हे.कॉ. देशमुख यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपासचक्रे फिरवून शेखच्या घराची झडती घेतली असता, चोरीचा मुद्देमाल आढळून आला.
तीन तासांत तपास
- घटनेची माहिती मिळताच आमच्या पथकाने कसून तपास केला. यामध्ये संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीची बायको आई पसार झाली आहे.
कैलास प्रजापती, पोलिस निरीक्षक, सातारा पोलिस ठाणे