आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दगडाच्या माऱ्यानेही उघडली नाही दानपेटी; चांदीचा मुकुट, चोरटे कॅमेऱ्यात कैद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोरी करण्यापूर्वी पुजारी राजू भारती यांच्यासह त्यांच्या शेजाऱ्यांच्या तीन घरांना बाहेरून कड्या लावल्या. - Divya Marathi
चोरी करण्यापूर्वी पुजारी राजू भारती यांच्यासह त्यांच्या शेजाऱ्यांच्या तीन घरांना बाहेरून कड्या लावल्या.
खुलताबाद - म्हैसमाळ येथील गिरिजादेवी मंदिरातील दोन दानपेट्यांसह चोरट्यांनी देवीचा चांदीचा मुकुट व दागिने पळवल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. चोरटे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. चोरीची माहिती मिळताच गुरुवारी सकाळी पोलिस पथकाने परिसरात भेट देऊन पाहणी केली. दानपेट्या पळवल्या परंतु त्या फुटत नसल्याने चोरट्यांनी त्या टॉवर परिसरातील टेकडीवर सोडून दिल्या. दानपेट्या पोलिसांनी जप्त केल्या असून सायंकाळी त्या फोडून रक्कम मोजण्यात आली.

मराठवाड्यातील महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथील गिरिजादेवीच्या मंदिरात बुधवारी रात्री चोरट्यांनी प्रवेश करत प्रथम देवीच्या अंगावरील दागिने व मुकुट काढून घेतला. यात चांदीचे छत्र, चांदीचा मुकुट, पितळी पादुका व काही रोख रक्कम, त्यानंतर मंदिरातील व समोरील अशा दोन दानपेट्या फुटत नसल्याने उचलून नेल्या. दानपेट्या म्हैसमाळ परिसरात असलेल्या टॉवरजवळील टेकडीवर तर पितळी पादुका व दानपेट्याचे कळस मंदिराच्या मागील बाजूस सापडल्या. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतमकुमार यावलकर, उपविभागीय अधिकारी राजीव नंदकरसह पंचायत समिती उपसभापती दिनेश अंभाेरे यांनी गुरुवारी सकाळी मंदिर परिसरात पाहणी करून चौकशी केली.

श्वानपथकाच्या मदतीने त्यांनी माग काढत मंदिराच्या मागील बाजूस त्यांना पादुका व दानपेट्यांचे कळस आढळले. दुपारी परिसरात एका गुराख्याला दोन दानपेट्या टॉवरजवळ दिसल्या. या प्रकरणाची माहिती त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच दानपेट्या ताब्यात घेेतल्या. दुपारी ग्रामीण पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी भेट देऊन चौकशी केली. तसेच मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सध्या मराठवाड्यात दुष्काळाची छाया असून ग्रामीण भागात बँका फोडण्याच्या सत्रानंतर आता चोरट्यांनी आपला मोर्चा मंदिरांकडे वळवला असल्याचे चित्र दिसत आहे.

यांनी दिल्या भेटी
ग्रामीण पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतमकुमार यावलकर, उपविभागीय अधिकारी राजीव नंदकर, पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, उपनिरीक्षक ए. ओ. पठाण, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कांचन चाटे, पोलिस कर्मचारी मोईस बेग, उपनिरीक्षक एम. पी. घुगे, फिंगरप्रिंट सहायक निरीक्षक विजय मदणे आदींनी घटनास्थळी भेटी दिल्या.

तीन घरांना बाहेरून कड्या लावल्या
- गिरिजादेवी मंदिरात बुधवारी रात्री चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी पुजारी राजू भारती यांच्यासह त्यांच्या शेजाऱ्यांच्या तीन घरांना बाहेरून कड्या लावल्या. तीन चोरट्यांनी नंतर रात्री १.२१ मिनिटांनी मंदिरात प्रवेश केला. त्यांनी मंदिरात प्रथम पाहणी करून चांदीचे छत्र व चांदीचे मुकुट काढून घेतले. तसेच सोन्याचे मणिमंगळसूत्र व नथ चोरण्याचा प्रयत्न केला, परंतु मणिमंगळसूत्र व नथ चोरट्यांनी तेथेच सोडून १.२३ मिनिटांनी मंिदरातील भरलेली मोठी दानपेटी उचलून बाहेर नेली, तर १.२८ मिनिटांनी दुसरी दानपेटी मंदिरातून बाहेर नेली.
- चोरटे दानपेट्या उचलून नेत असल्याचे मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. तीनपैकी दोन चोरट्यांनी तोंडाला कपडा बांधला होता, तर एकाचा चेहरा उघडा दिसत होता. रात्रीची वेळ असल्याने चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. तिन्ही चोरटे दिसायला जाड व उंच होते.
-पुजारी लघुशंकेसाठी घराबाहेर येत असताना त्यांना दाराला बाहेरून कडी लावल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील हॉटेल चालकांनी मंदिराच्या दिशेने धाव घेत कड्या उघडल्या. मंदिरात पाहणी केली असता दोन दानपेट्यांसह सोन्या- चांदीचे दागिने व दीड लाख रुपये चोरी गेल्याचे लक्षात आले.
दणकट दानपेट्या
दोन दानपेट्यांपैकी एक दहा तर दुसरी पाच वर्षे जुनी होती. दानपेटीचे वजन रिकामे सुमारे ४० ते ५० किलो होते. दोन्ही दानपेट्या लोखंडाच्या होत्या. त्या दगडाने फुटत नसल्याने मोठा अनर्थ टळला.

दोन तास मोजली दीड लाख रक्कम
चोरट्यांनी सोडून दिलेल्या दोन्ही दानपेट्यांवर दगडाने मारल्याच्या खुना दिसून आल्या. परंतु पेट्या फूटल्या नाही. पोलिसांनी त्या जप्त केल्या. गुरूवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात पोलिस प्रशासन, मंदिर प्रशासन व तहसीलदारांच्या उपस्थितीत दानपेटी काढून रक्कम मोजण्यात आल्या. यात मोठ्या दानपेटीत १ लाख ४७ हजार ४०९ तर छोट्या दानपेटीत ५ हजार २८५ एवढी रक्कम निघाली.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...