आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Theft Issue At Aurangapura, Aurangabad, Maharashtra

वाॅचमन असूनही टिळक पथवरील दूल्हा दुल्हन दुकानात ३ लाखांची चोरी, "एसी'च्या जागेतून चाेरटे घुसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - टिळक पथवरील प्रसिद्ध दूल्हा दुल्हन या प्रतिष्ठित कापड दुकानात सोमवारी (२५ ऑगस्ट) पहाटे चोरट्यांनी डल्ला मारला. अडीच किलो चांदीच्या नाण्यांसह तीन लाखांचा ऐवज त्यांनी लंपास केला. गच्चीवरील लाेखंडी दरवाजा उचकटून ते इमारतीत घुसले. दुसऱ्या मजल्यावरील एसी तोडून ते दुकानात शिरले. दुकानातील विद्युत पुरवठा बंद केला नसता तर ११ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरट्यांच्या हालचाली कैद झाल्या असत्या. दरम्यान, वॉचमनसह सात विश्वासू कामगारांची पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे.

दुकान मालक अनिल अग्रवाल नेहमीप्रमाणे रविवारी रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले. सात वर्षांपूर्वी शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागली होती. त्यामुळे अग्रवाल यांना जाण्यापूर्वी दुकानातील विद्युत पुरवठा बंद करण्याची सवय होती. त्यामुळे विद्युत पुरवठा बंद असल्याने चोरट्यांचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ शकले नाही. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दुकान उघडून अग्रवाल आतमध्ये गेले. गल्ल्यातील ऐवज गेल्यामुळे त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती क्रांती चौक पोलिसांना दिली. सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, पोलिस निरीक्षक गोवर्धन कोळेकर, पोलिस उपनिरीक्षक अमोल सातोदकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा, ठसेतज्ज्ञ , श्वानपथक सकाळी ११.३० वाजता घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांनीही रात्री घटनास्थळाची पाहणी केली.
एसी तोडून घुसले
गंगा जमुना दुकानाच्या शेजारी बांधकाम सुरू असून त्याआधारे चोरटे गंगा जमुनाच्या गच्चीवर आले असतील, असा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर गच्चीवर आले, लोखंडी दरवाजाची कडी उचकटवली. दुसऱ्या मजल्यावरील एसी तोडून दुकानात प्रवेश केला. आत आल्यानंतर दोन मजल्यांवरील दोन वेगवेगळ्या काउंटरमधील ऐवज चोरट्यांनी लांबवला. दुसऱ्या मजल्यावर कॅश काउंटरच्या ड्राॅवरमधील एक लाख ७० हजार रुपये, तर तळमजल्यावरील कॅश काउंटरमधील ८२ हजार ७३० रुपये लांबवले. शिवाय अडीच किलो चांदीची नाणी त्यांनी खिशात घातली. ३७ हजार ५०० रुपयांची ही चांदी असल्याचे अग्रवाल म्हणाले.
संशय नोकरावर
दुकानात ४२ कामगार अाहेत. पोलिसांनी तपासाची सुई कामगारांकडे वळवली असून सात जणांची कसून चौकशी केली आहे. त्यापैकी वॉचमन असताना चोरी झालीच कशी, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले. वॉचमन विलास जोशी यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय नेहमी दुकानाला कुलूप लावणाऱ्या, आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या नोकरांचीही चौकशी केली. कायमस्वरूपी आणि दैनंदिन वेतनावरील कामगारांचेही जबाब नोंदवण्यात येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.