आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - मोबाइल ही सध्या गरजेची वस्तू झाली आहे. मोबाइल नसेल तर एकमेकांशी संपर्कच तुटतो. मात्र पोलिस दप्तरी मोबाइल चोरीच्या कमी तर गहाळ झाल्याच्याच जास्त नोंदी होत आहेत, तर मोबाइल सापडेलच याची शाश्वतीही कोणी देऊ शकत नाही. वर्षाकाठी सुमारे आठशे मोबाइल गहाळ झाल्याच्या नोंदी पोलिस दप्तरी होत आहेत. त्यातच मूकबधिराचे नाटक करून आंध्र प्रदेशातील टोळी मोबाइल आणि महागड्या वस्तू क्षणार्धात पळवत आहेत.
गारखेडा परिसरातील मृगनयनी हॉटेलमध्ये 6 एप्रिल रोजी रात्री नऊच्या सुमारास एक चोर शिरला. या वेळी हॉटेलमध्ये मित्राला भेटण्यासाठी आलेले निशांत ओमप्रकाश चंद्रमोरे (29) हे एकटेच होते. हॉटेलवरील टेबल क्र. 11 वर त्यांनी दोन मोबाइल ठेवलेले होते. त्यांचा मित्र हॉटेलच्या केबिनमध्ये असल्याने चंद्रमोरे टेबलवर मोबाइल ठेवून गेले. यादरम्यान, क्षणार्धात या चोराने त्यांचा नोकिया लुमिया हा 25 हजारांचा तर अँपल कंपनीचा 35 हजार 500 रुपयांचा मोबाइल चोरून नेला. हा प्रकार घडल्यानंतर चंद्रमोरे यांनी चोरटा सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालाय का हे पाहिले. तेव्हा मात्र कॅमेराच बंद असल्याचे निदश्रनास आले. यापूर्वी हा चोरटा एकदा भूक लागली म्हणत आणि पिण्यासाठी पाणी मागायला हॉटेलात आला होता. चंद्रमोरे यांनी शंका व्यक्त केल्याने या चोरावर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशय असल्यावरच होतो गुन्हा दाखल : शहरातील अनेकांचे मोबाइल चोरीला गेले आहेत, परंतु प्रत्येक पोलिस ठाण्यात गेल्यानंतर मोबाइल गहाळ झाल्याचीच तक्रार घेतली जाते. कोणावर संशय व्यक्त केला तरच पोलिसात गुन्हा दाखल केला जात आहे. जेव्हा की, एखाद्या व्यक्तीच्या हरवलेल्या वस्तूचा अथवा मालमत्तेचा अप्रामाणिकपणे वापर केल्यास कलम 403 या कलमानुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले.
10 सिमकार्डच्या कंपन्या आणि 30 सर्कल : देशभरात मोबाइल सिमकार्डच्या 10 कंपन्या असून त्याचे 30 सर्कल पाडण्यात आले आहेत. मोबाइल हरवल्यावर त्याचा शोध घ्यावा म्हणून कंपन्यांना पत्र दिले जाते. त्यानंतर आयएमईआय क्रमांकावरून मोबाइलचा शोध घेण्यास सुरुवात केली जाते. त्यातही महिना-15 दिवसांतून एकदा सिमकार्ड कंपनी मोबाइलचा शोध घेते. शोध लागल्यास त्याचा क्रमांक आणि ठिकाण कळवले जाते. अन्यथा उपलब्ध नसल्याचा मॅसेज पोलिसांना पाठवला जातो. मोबाइल कंपन्यांकडे कुठलाही सेंट्रलाइज डाटा नसल्याने चोरीला गेलेले मोबाइल सापडण्याची शाश्वती नाही.
मूकबधिरांचे नाटक करून मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तू पळवणारी आंध्र प्रदेशची टोळी शहरात सक्रिय झाली आहे. चोरांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मात्र नागरिकांनादेखील असे चोर आढळल्यास त्यांना पकडून ठेवत याची माहिती तत्काळ नजीकच्या पोलिस ठाण्याला कळवावी. -हेमंत कदम, पोलिस निरीक्षक
परराज्यांसह परदेशात होते चोरीच्या मोबाइलची विक्री
महागडे मोबाइल चोरल्यानंतर त्यांची विक्री परराज्यात अथवा परदेशात केली जाते. महाराष्ट्र आणि गोवा हे एक सर्कल आहे. चोरीचा मोबाइल दोन राज्यांत मोबाइल असल्यास आणि त्यात सिमकार्ड असेल तर त्याचा शोध लागू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. परराज्यांत विकलेल्या मोबाइलचा शोध घेण्यासाठी मोबाइल कंपन्यांकडे वारंवार पाठपुरावा करावा लागतो. राज्यातून दररोज सुमारे 5 हजार मोबाइल गहाळ किंवा चोरीला गेल्याच्या तक्रारी होत आहेत.
सिमकार्ड विकणार्या कंपन्यांनी काय करावे
मोबाइल कंपन्यांनी सर्वात आधी मोबाइल डिरेक्टरी तयार करायला हवी. एका व्यक्तीच्या नावे किती सिमकार्ड आहेत, याचा डाटा तयार करायला हवा. त्याच्या मोबाइल क्रमांकाचा आयएमईआय क्रमांकही त्यात हवा. जेणेकरून हरवलेल्या अथवा चोरीला गेलेल्या मोबाइलमध्ये सिमकार्ड टाकताच त्याचा शोध लागू शकेल. तसेच चोरीच्या मोबाइलधारकाला सिमकार्डच देऊ नये. त्यामुळे मोबाइल चोरल्यानंतर त्याचा फायदा घेता येणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.