आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दुकाने फोडून आठ लाख रुपयांचा माल लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - वाळूज औद्योगिक क्षेत्रात चोरट्यांचा उच्छाद सुरू आहे. पंढरपुरातील सलग पाच दुकान फोडल्याची घटना ताजी असताना पुन्हा वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन दुकाने फोडून चोरट्यांनी सुमारे आठ लाखांचे साहित्य लंपास केल्याची घटना शनिवारी (19 जुलै) सकाळी उघडकीस आली. चो-या, घरफोड्या, सोनसाखळी लंपास करणे आदी घटनांमध्ये वाढ होत असल्याने व्यापारी व नागरिकांतून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ही चोरीची घटना 20 एप्रिल 2013 रोजी राजेश टूल्स सेंटरमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेशी मिळतीजुळती आहे. या घटनेतील चोरटे अद्यापही मोकाटच असल्यामुळे त्यांनीच ही चोरी केल्याचा संशय आहे.
वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सी सेक्टरमध्ये ‘उद्योग भारती’ कॉम्प्लेक्स आहे. येथील शॉप नं. बी-6 मधील अविनाश भास्कर भिसे यांच्या मालकीच्या गजानन ट्रेडिंग कंपनीचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल दोन लाखांचा ऐवज लंपास केला. तसेच लगतच्या शॉप नं. ए-10 मधील शेख शाहिद शेख मोहंमद यांच्या मालकीच्या युनिक एंटरप्रायझेसचे शटर उचकटून आतील कटिंग टूल्स, ड्रिल बीट, टॅप सेट, कार्बन वेल्डिंग
मटेरिअल आदी सुमारे 6 लाख रुपयांचे महागडे साहित्य चोरून नेले. चोरट्यांनी जाता जाता सी 274 मधील इंद्रजित पवार यांच्या मालकीचे शटर उचकटून आत प्रवेश केला. मात्र, त्यातून काहीच चोरीला गेले नाही. या चोरीच्या घटनांची सध्या चौकशी सुरू असून चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे महिला फजदार रेश्मा सौदागर यांनी सांगितले.
70 लाखांचा ऐवज लंपास करणारे अद्याप फरारच
एमआयडीसीतील महावीर चौकालगतच्या राजेश टूल्स सेंटरमधून चोरट्यांनी 70 लाख रुपयांचे महागडे साहित्य 20 एप्रिल 2013 रोजी लंपास केले होते. दोन चोरटे तोंड बांधून होते हे सीसीटीव्ही कॅमे-यात स्पष्टपणे दिसले. मात्र, पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. या चोरट्यांच्या शोधासाठी पोलिस पथक दिल्लीची वारीही करून आले. मात्र, अद्याप चोरटे हातील लागले नाही. त्यातच शुक्रवारी रात्री चोरी झाल्याने त्याच चोरट्यांनी पुन्हा चोरी केल्याचा संशय व्यापारी व्यक्त करत आहेत.
महागड्या मटेरियलवर हात
परिसरातील लहान-मोठ्या शॉपसह विविध कंपन्यांना लागणा-या साहित्याची ठोक व किरकोळ विक्री करणा-या या दोन्ही दुकानांतील लोखंडी कपाटातील केवळ महागड्या साहित्यावरच चोरट्यांनी हात मारला. इतर साहित्याला हातही लावला नाही.