आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलमंडीवरून ३.५ लाखांची बॅग पळवली, कोणी नाही पाहिली!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बीडबायपास रोडवर पावणेनऊच्या सुमारास व्यापाऱ्यावर चाकूहल्ला करून लुटण्याच्या प्रकाराला चोवीस तास होत नाहीत तोच गुलमंडीसारख्या गजबजलेल्या भागातून रोहित मनोज कासलीवाल (२५, रा. बालाजीनगर) या व्यापाऱ्याची साडेतीन लाख रुपये असलेली बॅग पळवल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. प्रकार घडला तेव्हा कोणीही पाहिला नाही. शिवाय भागातील सीसीटीव्हीत कैद झालेला नसल्याचे सिटी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी सांगितले.

कासलीवाल यांची नव्या मोंढ्यात ओम ट्रेडिंग कंपनी हे धान्याचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी रोहित याने निराला बाजारातील एचडीएफसी बँकेतून साडेतीन लाख रुपये काढले. त्यानंतर तो गुलमंडी चौकाजवळील मलकापूर बँकेत जाण्यासाठी निघाला. चौकात आल्यानंतर दुचाकीच्या डिकीत ठेवेलेली पैशाची कापडी पिशवी बाहेर काढली. तेवढ्यात रिक्षातून उतरलेल्या एका व्यक्तीने त्याच्या हातातील बॅग हिसकावली आणि रिक्षात बसून तो पैठण गेटच्या दिशेने निघून गेला, अशी माहिती रोहितने दिली. घटनेची माहिती सिटी चौक पोलिसांना कळताच पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे, गुन्हे शाखेचे गजानन कल्याणकर आणि पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी इतर पोलिसांना तत्काळ नाकेबंदीच्या सूचना दिल्या. प्रत्येक चौकात रिक्षा तपासण्यात आल्या, मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.

व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण : गुरुवारीरात्री नऊच्या सुमारास सूर्या लॉन्ससमोर दीपक कासलीवाल जात असताना त्यांच्याजवळ असलेले २५ हजार रुपये हिसकावण्याचा प्रयत्न दुचाकीवर आलेल्या तिघांनी केला होता. कासलीवाल यांनी पैशाची बॅग सोडली नाही म्हणून या चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने वारदेखील केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. मुकुंदवाडी पोलिस या आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, शुक्रवारीही अशीच घटना घडल्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटना कशी कळली नाही?
पोलिसांनी हातगाडीवाले, दुकानदारांची चौकशी केली. मात्र, कोणाला काहीच माहिती नव्हते. विशेष म्हणजे रोहितला चोरट्याचे वर्णनही सांगता येत नाही. घटनास्थळापासून काही आंतरावर दोन हॉटेल आहेत. या दोन्ही हॉटेल मालकांनी सीसीटीव्ही लावले आहेत. याशिवाय याच भागातील मशिदीवर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. यात भोवतालच्या परिसरातील घटना- घडामोडी टिपल्या जातात. पोलिसांनी त्या तपासल्या असता, त्यात अशी कुठलीही घटना टिपली गेलेली नाही.