आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातही ISIS चे अस्तित्व, केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांची कबुली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतातही इसिसचे अस्तित्व असल्याची कबुली केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र, भारतीय कुटुंबातील संस्कार प्रभावी असल्यामुळे दहशतवाद्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. जगातील दुसरी मोठी मुस्लिम लोकसंख्या भारतात असल्याने इसिसचे हा देश लक्ष्य आहे. याची केंद्र सरकारला जाणीव असून अशा संशयास्पद कारवायांवर संबंधित यंत्रणा बारकाईने नजर ठेवून असल्याचेही रिजिजू म्हणाले.

या वेळी भाजप आमदार अतुल सावे यांची उपस्थिती होती. रिजिजू म्हणाले, देशभरातील पोलिस महासंचालकांची नुकतीच गुजरातेत भुज येथे बैठक झाली. या बैठकीतही गांभीर्याने चर्चा झाली असून हा प्रश्न गांभीर्याने हाताळला जात आहे. देशात भाजप सरकार आल्यानंतर खूप कमी प्रमाणात विरोधाभास जनतेसमोर आले. राष्ट्रीय सुरक्षिततेबरोबरच शांतता प्रस्थापित होऊन देशाने विकासाची कास धरावी, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते हस्तक शोधणार
पठाणकोट हवाईतळावर झालेल्या हल्ल्यामागे दहशतवादी संघटनेचा मोठा कट होता. मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणांनी तो हाणून पाडला. त्यांचा नेमका उद्देश काय होता हे जाहीरपणे सांगता येणार नाही. मात्र, या दहशतवाद्यांना कोणी मदत केली, याचा तपास सुरू आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर विशेष समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच सत्य समोर येईल. पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला भेट दिल्यानंतर झालेला हा परिणाम आहे का, या प्रश्नावर "भारतात अशा घटना होण्याची ही काही पहिली वेळ नाही, असे उत्तर रिजिजू यांनी दिले.

हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध
आतापर्यंत देशात अनेक दहशतवादी हल्ले झाले. यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारत सरकारने पाकिस्तान सरकारकडे सुपूर्द केले होते. प्रत्येक वेळी पाकिस्तानने हात झटकले होते. मात्र, या वेळी पुरावे सादर केल्यानंतर त्यांनी ते मान्य करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. भारत सरकारला मिळालेले हे मोठे यश असल्याचे रिजिजू म्हणाले. भारत-पाक चर्चा यानंतरच्या काळात सुरू ठेवण्याबाबत पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्रालयच निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

ज्यांना देशाने मोठे केले त्यांचीच देश सोडण्याची भाषा...
असहिष्णुतेबाबत विचारलेल्या प्रश्नावर रिजिजू म्हणाले, जाणीवपूर्वक हे वातावरण निर्माण केले जात आहे. अरुणाचलमध्ये माझ्या मतदारसंघात काही गावांपर्यंत पोहचण्यासाठी दोन दिवस पायपीट करावी लागते. मात्र तेथील नागरिकही "भारत माता की जय'चा नारा मनापासून देतात. दुसरीकडे ज्यांना या देशाने लोकप्रियता दिली तेच जेंव्हा देश सोडण्याची भाषा करतात, त्याचे वाईट वाटते, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...