आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थर्मल पिंट्रर बंदीबाबत पेट्रोल डीलर्सचा पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - थर्मल प्रिंटरमधून निघणारा पावत्यांचा कागद आरोग्यासाठी घातक असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ ने प्रकाशित करताच लोक सतर्क झाले आहेत. औरंगाबाद पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी तातडीने बैठक घेत पिंट्रर व कागद वापरण्याच्या बंदीबाबत कंपन्यांना पत्र देण्याचा निर्णय घेतला, तर क्रांती चौकातील हिंद सुपर पेट्रोल पंपाच्या मालकांनी थर्मल पेपर प्रिंटरऐवजी डॉटमॅट्रिक्स पिंट्रर तातडीने बसवून घेतले.

एटीएम, पेट्रोलपंपावरील पावती, बसची तिकिटे, शॉपिंग मॉल आदी ठिकाणी मिळणार्‍या पावत्यांवरील रसायन कोटिंगमुळे हाताळणार्‍यांना कॅन्सरसारखे गंभीर आजार होत असल्याचे वृत्त 22 जून रोजी ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केले. या वृत्तानंतर औरंगाबाद शहरातील पेट्रोल डीलर्स संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली. संघटनेचे सचिव अखिल अब्बास आणि कोशाध्यक्ष हितेन पटेल यांनी सांगितले की, थर्मल पिंट्ररच्या बिलावरील प्रिंट काही दिवसांनंतर उडून जात असल्याने आम्ही यापूर्वीच पेट्रोलियम कंपनीला पत्र पाठवून साधे प्रिंटर ठेवण्यास परवानगी मागितली होती. मात्र, कंपन्यांनी त्याला विरोध दर्शविला. मात्र आता आरोग्याचा प्रश्न असल्याचे स्पष्ट झाल्याने यापुढे ते वापरले जाऊ नये असाच आम्ही प्रयत्न करणार आहोत. या संदर्भात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स आणि फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोलियम डीलर्सकडे निवेदन देऊन केंद्र व राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार आहोत.

मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांना पत्र
सामाजिक कार्यकर्ते आणि कॉँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, केंद्रीय आरोग्य मंत्री व सचिव यांच्या नावाचे निवेदन विभागीय आयुक्तांकडे सादर करून थर्मल पेपर बंदी घालण्याची विनंती केली आहे. गंभीर असल्याने उपायुक्त विजयकुमार फड यांनी तातडीने आलेल्या निवेदनाची दखल घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयाने सविस्तर पत्र लिहून याप्रकरणी निर्णय घेण्याची विनंती सरकारला केली आहे.