आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीला या, आरोग्य मंत्र्यांची भेट घालून देते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियान कार्यक्रमातंर्गत काढलेल्या टी. व्ही. सेंटर ते संत तुकाराम नाट्यगृहापर्यंत पदयात्रेत सहभागी झालेले विद्यार्थी. - Divya Marathi
तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियान कार्यक्रमातंर्गत काढलेल्या टी. व्ही. सेंटर ते संत तुकाराम नाट्यगृहापर्यंत पदयात्रेत सहभागी झालेले विद्यार्थी.
औरंगाबाद- तंबाखूच्या सेवनामुळे ६० लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. शासनाने तंबाखूविरोधी कायदा केला असला तरी पाहिजे तशी जनजागृती झालेली नाही. शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर तसेच त्याबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे. कर्करोगाचे रुग्ण वाढतच आहेत. शासकीय कर्करोग रुग्णालयातील दुसऱ्या युनिटसाठी केंद्र शासनाकडे ६२ कोटींची मागणी केल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद सलाम फाउंडेशन मंंुबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी २५ जुलै रोजी तंबाखूमुक्त महाराष्ट्र अभियान कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी टीव्ही सेंटर ते संत तुकाराम नाट्यगृहापर्यंत जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. या वेळी माजी उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, उद्योजक सचिन मुळे, नंदकिशोर कागलीवाल, नीलेश राऊत, अनुपमा पाथ्रीकर, शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे, माजी शहराध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय, भाऊसाहेब चिकटगावकर आदींची उपस्थिती होती.
पदयात्रेच्या प्रारंभी खासदार सुळे म्हणाल्या की, तंबाखूमुक्त महाराष्ट्र होणे गरजेचे आहे. ६० लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू तंबाख्ूमुळे होत आहे. त्यामुळे राज्यातील दहा शहरांत जनजागृती अभियान राबवले जाणार आहे. कॅन्सर हॉस्पिटलच्या दुसऱ्या युनिटसाठी केंद्र शासनाकडे ६२ कोटी रुपयांची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही दुर्दैवी गोष्ट आहे. स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठीही आमचे प्रयत्न चालू आहेत.
संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात माजी उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे म्हणाले की, चार महिन्यांचा अभ्यास केल्यानंतर कर्करोगावर जनजागृती करण्याचे ठरवले. तंबाखू सेवन हे आई-वडील, मित्रमंडळी, नातेवाईक, जाहिराती हे पाहून होत असून सवयीवर मात होत नाही. आपले जीवन सुंदर आहे आणि ते सुंदरपणे जगले पाहिजे, असाही संदेश त्यांनी दिला. या वेळी विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांविराेधात शपथ घेतली. मुलांनी मागण्या मांडल्या तसेच चित्रफितीद्वारे जनजागृती केली. या वेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलाम फाउंडेशनच्या उपाध्यक्ष राजश्री कदम यांनी केले.

तरुणांमधील व्यसनाधीनतेमुळे कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. माझे कुटुंब या आजाराच्या तणावातून गेले आहे. शिवाय आबांनाही मी डोळ्यांदेखत जाताना पाहिले. कर्करोग रुग्णालयाच्या दुसऱ्या युनिटचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी तुम्ही दिल्लीत या. तुमची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घालून देते, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, शासकीय कॅन्सर हॉस्पिटलचे मुख्य कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांना सांगितले.

तंबाखूमुक्ती अभियानानिमित्त त्या शहरात आल्या असता त्यांनी कॅन्सर हॉस्पिटलला भेट दिली. या वेळी माजी मंत्री राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण यांची उपस्थिती होती. सुळे यांनी रुग्णांची विचारपूस केली. रुग्णालयात उपचारांसाठी अनेकांना चार महिने वाट पाहावी लागते. कर्करोगाला पहिल्या टप्प्यात उपचार मिळाल्यास रुग्णाला वाचवणे शक्य असते. मात्र, वेटिंग लिस्टच चार महिने असल्याने शेवटच्या टप्प्यातच रुग्णांना उपचार दिले जातात.
दुसरेयुनिट मिळणे गरजेचे

रुग्णांचाताण पाहता केंद्र सरकारला दुसरे युनिट सुरू करण्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी पाठवण्यात आला आहे. मात्र, अद्याप काहीच झालेले नाही. युनिट सुरू झाल्यास अधिक रुग्णांना तत्काळ उपचार देता येतील आणि जीव वाचवणे शक्य होणार आहे. याशिवाय तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्त्या आणि निवासी डॉक्टर तसेच इतर पदभरती आवश्यक असल्याचे रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी मांडले.

प्रचंडतणाव बघितला
कर्करोगविशेषत: तंबाखूच्या सेवनाने झालेला कर्करोग मी जवळून पाहिला आहे. साहेबांना (शरद पवार) कर्करोग झाला तेव्हा आम्ही प्रचंड तणावातून गेलो. वेळीच उपचार, पथ्य आणि व्यायाम केल्याने त्यावर मात करणे शक्य झाले. साहेबांचे उपचार अमेरिकेत झाले असले तरीही जेव्हा तेथील डॉक्टरांशी चर्चा व्हायची तेव्हा भारतात डॉक्टरांनी दिलेला सल्लाच तेही डॉक्टर्स देत असत. कर्करोग रुग्णालयात उत्तम काम सुरू आहे. कर्करोगावर हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक वर्षांपासून चर्चा करत होते. आता आलेले जे. पी. नड्डा यांच्या आम्ही संपर्कात आहोत. दुसऱ्या युनिटचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी तुम्ही दिल्लीला या, मी भेट घालून देते, असे सुळेंनी सांगितले.

या वेळी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. भारत सोनवणे, डॉ. कमलाकर माने, डॉ. विजय कल्याणकर, डॉ. बालाजी शेवाळकर, डॉ. मारुती पोटे, डॉ. सुनील देशमुख, डॉ. अजय बोराळकर, डॉ. शुभा घोणसीकर, डॉ. नाजनीन यांच्यासह विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
तंबाखूमुक्त अभियानानिमित्त टीव्ही सेंटर मैदानापासून टीव्ही सेंटर चौक- आंबेडकर चौक ते संत तुकाराम नाट्यगृहापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या वेळी १५ ते २० शाळांचा समावेश होता. पदयात्रेत तंंबाखूमुक्तीचा संदेश विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करून दिला. पाच हजारांहून अधिक मुले यात सहभागी झाली होती. या वेळी जि. प. शाळा नारला, ता. फुलंब्री येथील प्राथमिक शाळा जिल्ह्यातून तंबाखूमुक्त घोषित करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक बाळकृष्ण बखरे यांचा सत्कार करण्यात आला.