औरंगाबाद - महापौरांसह बहुतेक सर्वच पक्षांनी आयुक्तांवर थेट हल्ला करता
आपला राग व्यक्त करावा, अशी रणनीती आखूनही काही मोजक्या सदस्यांच्या आक्रमक धोरणामुळे बुधवारी सर्वसाधारण सभा पांगली, असे आता समोर आले आहे. मालमत्ता करवसुलीच्या नावाखाली आपापले वैयक्तिक राग व्यक्त करण्याची संधी या बड्यांनी साधल्याची चर्चा आहे.
मालमत्ता करवसुलीबाबत विशेष सर्वसाधारण सभा घेण्याआधी आयोजित बैठकीत सर्व पक्षांची रणनीती ठरली होती. त्यात पोलिस आयुक्तालयातील वसुली बैठक हा मुख्य मुद्दा असल्याने त्यावर सभागृहाने आपली तीव्र नाराजी व्यक्त करीत आपल्या भावना मांडाव्यात आयुक्तांना थोडे नरम भूमिका घेण्यास भाग पाडावे, असे ठरले होते. त्यानुसार कोणी काय बोलायचे याचेही नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात सभागृहात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. वंदे मातरम होताच भाजपचे राजू शिंदे यांनी माइकचा ताबा घेत ते आयुक्तांवर तुटून पडले. शिवसेनेचे गटनेते राजू वैद्य यांनीही आक्रमक भूमिका घेतली. पण महापौर सामंजस्याने मध्यममार्गी भूमिका घेत सदस्यांच्या भावना आयुक्तांना कळाव्यात यासाठी प्रयत्न करीत होते. तिकडे भाजपनेही आपल्या सदस्यांना आपण आयुक्तांवर तुटून पडायचे नाही, पण आपला विरोध दिसला पाहिजे असे वागण्याचा सल्ला दिला होता. शिवसेनेच्या इतर सदस्यांनी बैठक आयुक्तालयात घेणे चुकीचे आहे, असे आवर्जून सांगितले. भाजपच्या सदस्यांनीही ठरल्याप्रमाणे बाजू लढवली. एमआयएमनेही विकास एडकेंचा अपवाद वगळता ठरल्याप्रमाणेच भूमिका घेतली. पण राजू शिंदे राजू वैद्य यांनी 'आधी माफी नंतर दिलगिरी' अशी कठोर भूमिका घेतल्याने सभागृहाचा नूरच पालटला. आयुक्तांनी माफी मागणार नाही, असे सांगितल्याने प्रकरण जास्तच चिघळले सभा संपवण्यात आली.
कुलकर्णी, रामटेकेंवरून नाराजी
सर्वठरलेले असताना सभेला वेगळा टर्न देण्यामागे काय हेतू होता याची चाचपणी केली असता आयुक्तांनी डी. पी. कुलकर्णी शिरीष रामटेके यांच्यावरील कारवाईबाबत बड्या नगरसेवकांचे ऐकल्याने ते नाराज होते. या नाराजीचे रूपांतर त्यांनी आयुक्तांवर सभेत दबाव आणण्यात त्यांना निशाण्यावर घेण्यात झाल्याचे समोर आले आहे.