आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उसासाठी ठिबक सक्तीचे केल्यास एकरी ७५ लाख लिटर पाणी बचत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळावर मात करण्यासाठी उसासाठी ठिबक सिंचन सक्तीचे होणार आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना लवकरच जारी करणार असल्याचे संकेत नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ठिबक अनिवार्य झाल्यास एकरी ७५ लाख लिटर पाण्याची बचत होईल, असे मत कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पारंपरिक पद्धतीने उसासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो याकडे लक्ष वेधत तज्ज्ञांनी ठिबक सक्तीवर भर दिला आहे.

औरंगाबाद येथील विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्रातील विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. एस. बी. पवार यांनी सांगितले, पारंपरिक पद्धतीने उसाला पाणी दिल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. या पद्धतीत उसाला एकरी १ कोटी २५ लाख लिटर पाणी द्यावे लागते. याउलट ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास ५० ते ६० टक्के पाण्याची होते. ठिबक सिंचनात एक एकर उसासाठी ५० लाख लिटर पाणी लागते. कोणत्याही पिकाला देण्यात येणारे पाणी हेक्टर सेंटिमीटर या प्रमाणात मोजतात. एक हेक्टर सेंमी म्हणजे एक लाख लिटर पाणी. ऊस हे मोठ्या प्रमाणात पाणी पिणारे पीक आहे. पारंपरिक पद्धतीत आडसाली उसाला ३४० ते ३५० हेक्टर सेंटिमीटर तर पूर्वहंगामी उसाला ३०० ते ३२५ हेक्टर सेंमी पाणी लागते. सुरू उसाला २५० ते २७५ हेक्टर सेमी तर खोडव्याला २२५ ते २५० हेक्टर सेमी पाणी लागते. बहुतेक वेळा चुकीच्या पद्धतीनेही पाणी दिले जाते. उदाहरणार्थ ऊस उगवणीच्या काळात सरी वरंबा पद्धतीत शेतकरी पूर्ण सरी भरून पाणी देतात याचा ऊसवाढीला तर उपयोग होत नाहीच, शिवाय नत्रयुक्त खते वाया जातात.

ठिबकमुळे होणारी बचत अशी
डॉ. पवार यांनी सांगितले, पारंपरिक पाणी देण्याच्या पद्धतीत पाणी किती दिले हे मोजण्याची यंत्रणा नाही. याउलट ठिबक सिंचनात पाणी केव्हा व किती द्यायचे यावर नियंत्रण असते. पाणी नेमक्या प्रमाणात दिल्याने जमिनीतील पाणी व हवेचा समतोल योग्य राखून उसाच्या उत्पादनवाढीस मदत होते. ठिबक सिंचनाने उसाला कोणत्या महिन्यात, किती वेळ व किती प्रमाणात पाणी द्यावे याचे गणित ठरलेले आहे. ते वापरल्यास एकरी ७५ लाख लिटर पाण्याची बचत साधता येते.

वेळापत्रक पाळा, बचत साधा
उसाला जानेवारीमध्ये ४ लिटरचा ड्रीपर असणारा संच दररोज ३४ मिनिटे चालू ठेवावा, फेब्रुवारीत दररोज ४९ मिनिटे, मार्चमध्ये एक तास ३१ मिनिटे, एप्रिल एक तास ४८ मिनिटे, मे २ तास २० मिनिटे, जूनमध्ये एक तास २५ मिनिटे, जुलै एक तास पाच मिनिटे, सप्टेंबर एक तास नऊ मिनिटे, ऑक्टोबर एक तास २ मिनिटे, नोव्हेंबर ४८ मिनिटे आणि डिसेंबर दररोज ३३ मिनिटे पाणी दिल्यास एकरी ७० ते ७५ लाख लिटर पाण्याची बचत होईल, असे गणित डॉ. पवार यांनी सांगितले.

ठिबकला येणारा खर्च
सर्वसाधारणपणे एक एकर उसासाठी ठिबकसाठी ५५ ते ६० हजार रुपये खर्च येतो. पट्टा पद्धतीत पाच फूट पट्ट्यासाठी एकरी ५५ हजार, तर चार फूट पट्ट्यासाठी एकरी ६० हजार रुपये खर्च येतो. बहुतेक साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना अनुदानावर ठिबक संच दिले आहेत, मात्र अनेक शेतकरी त्याचा वापर करत नसल्याचे चित्र आहे.