आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरोडी शिवारात दरोडेखोरांचा तासभर धुमाकूळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - शिरोडी शिवारातील शेंडगे यांच्या शेतवस्तीवर पाच दरोडेखोरांनी गुरुवारी रात्री धुमाकूळ घातला. शेंडगे कुटुंबीयांना मारहाण करीत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख 25 हजार असा एकूण 44 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांच्या मारहाणीत एका ज्येष्ठ महिलेसह तीन जण जखमी झाले आहेत. मध्यरात्री साडेबारा ते दीडच्या सुमारास हा थरार सुरू होता. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाळूज पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.

कासोडा येथील पुंजाराम शेंडगे यांची शिरोडी शिवारात शेती आहे. या शेतवस्तीवर त्यांचा मुलगा दिलीप, त्याची पत्नी कविता व मुलगा अक्षय (12) आणि मुलगी तनुश्री (5)असे चौघे वास्तव्यास आहेत. गुरुवारी दिलीप यांच्या आत्या भिकाबाई भीमराव वैद्य (65) यासुद्धा वस्तीवर आल्या होत्या. रात्री सर्व जण अंगणात झोपले होते.

मारहाण करून दागिने ओरबाडले
जेवण आटोपून शेंडगे कुटुंब रात्री साडेनऊच्या सुमारास झोपी गेले. सर्व गाढ झोपेत असताना मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तोंड बांधून हातात लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या पाच दरोडेखोरांनी प्रथम कविता शेंडगे यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील झुंबर, कुडके, चांदीचे जोडवे, चेन काढून घेतली. त्याच वेळी दिलीप यांच्या डोक्यावर दांडक्याचा प्रहार केल्याने ते झोपेतच बेशुद्ध पडले.

रात्रभर मदतीशिवाय विव्हळत पडले जखमी
दरोडेखोरांच्या मारहाणीत बेशुद्ध झालेले दिलीप शेंडगे दोन ते अडीच तास बेशुद्धच होते. त्यामुळे पत्नी कविता, आत्या भीमाबार्इंसह अक्षय व तनुश्री हे सर्व जण प्रचंड घाबरले होते. त्यांच्याकडील मोबाइल वीज नसल्याने चार्ज नव्हता. त्यामुळे कुणाशी संपर्क साधणेही शक्य होईना. अडीच तासांनंतर जेव्हा दिलीप शुद्धीवर आले तेव्हा ते सर्वजण तेथून जवळ असलेल्या कारभारी शेंडगे यांच्या वस्तीवर गेले. त्यांना सर्व हकिगत सांगितली. मात्र, त्यांचाही मोबाइल डिस्चार्ज असल्याने नाइलाजाने त्यांना जखमांमुळे विव्हळत तशीच रात्र काढावी लागली. सकाळी वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर मोबाइलवरून ही माहिती गावात कळवल्यानंतर वाहन आले आणि सर्व जखमींनी पोलिस ठाणे गाठले.

जखमींवर उपचार
पोलिसांनी जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलवले. नंतर सर्वांना वाळूज एमआयडीसीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिलीप यांच्या मेंदूला मार लागल्याची शंका डॉक्टरांनी व्यक्त केली.

अगोदर दंडाला टोचले इंजेक्शन
दिलीप यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्यानंतर अर्धवट शुद्धीत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी त्यांच्या उजव्या हाताच्या दंडात तीन वेळा इंजेक्शन टोचले. त्यामुळे ते ताबडतोब बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांनी आत्या भिकाबाई यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. दांडक्याच्या टोकदार खणाचा फटका बसल्याने भिकाबाई यांच्या मांडीला मोठी जखम झाली आहे.

छातीवर पाय देऊन गळा आवळला
गळ्यातील सोन्याची पोत तोडताना भिकाबाई यांनी प्रतिकार केल्याने एका दरोडेखोराने भिकाबाई यांच्या छातीवर पाय देऊन त्यांचा गळा आवळला आणि सोन्याच्या मण्यांची पोत, कानातील झुंबर, कुडके काढून घेतली.
मुलांना मारू नका
घरातील सदस्यांना एक-एक करून मारहाण सुरू होती. मोठ्यांना मारहाण केल्यानंतर दरोडेखोर मुलांनाही मारहाण करतील, असे वाटल्याने कविता व भिकाबाई यांनी दरोडेखोरांना ‘तुम्ही सर्वकाही न्या, मात्र मुलांना मारहाण करू नका’ अशी विनवणी केल्याने त्यांनी अक्षय व तनुश्री यांना हात लावला नाही. त्यानंतर ते घरात शिरले. दिलीप शेंडगे यांनी बी-बियाण्यांसाठी घरातील डब्यात ठेवलेले रोख 20 हजार व त्यांच्या पत्नीने ठेवलेले पाच हजार असे 25 हजार रुपये क ाढून घेतले. तब्बल तासभर धुमाकूळ घालून दरोडेखोर निघून गेले.
शस्त्र परवाना असलेल्या शेतक-यांनी शस्त्रे वापरावीत
ग्रामीण भागात दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली ही चिंतेची बाब आहे. मात्र, वस्तीवर राहणा-या आणि शस्त्राचा परवाना मिळवलेल्या नागरिकांनी या शस्त्रांचा वापर करावा. ती शस्त्रे शोसाठी नाहीत. तेव्हाच अशा घटना टळतील. ज्यांच्याकडे शस्त्रे नाहीत त्यांनी परवाना मिळवून घ्यावा. आम्ही सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत. शेतवस्तीवरील रहिवाशांनी रात्रीच्या वेळी गटागटाने एकत्र राहावे. या दरोडेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. लवकरच यश येईल, असे वाटते. अशोक कदम, पोलिस निरीक्षक, वाळूज पोलिस ठाणे