आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामिनावर सुटताच चोरी, पोलिसांनीही पुन्हा पकडले!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गोलवाडी येथील उद्योगपती प्रवीण तुलसीयान यांच्या बंगल्यात ३० मे २०१५ रोजी पहाटे शिरून पाच ते सहा जणांनी दरोडा टाकला होता. तेथील रक्षकांना बांधून ठेवत सुमारे २३ लाखांचा ऐवज चोरून नेला होता. या प्रकरणात पोलिसांनी अजय ठाकूर याच्यासह त्याचा साथीदार संतोष खरे याला पकडले होते. काही दिवस कारागृहात राहिल्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली. मात्र जामिनावर सुटताच या टोळीने पुन्हा हैदाेस घालण्यास सुरुवात केली. मात्र गुन्हे शाखा पोलिसांनी त्यांना पुन्हा गजाआड केले.

शहरात घरफोड्या करून त्यात चोरलेले सोन्या-चांदीचे दागिने विक्रीसाठी अट्टल गुन्हेगार उस्मानपुरा भागातील पीरबाजारात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस आयुक्त अमितेशकुमार, उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मधुकर सावंत, सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे, उपनिरीक्षक प्रशांत आवारे, विजय पवार, अमित बागूल, जमादार अशोक नरवडे, सिद्धार्थ थोरात, योगेश गुप्ता, नंदलाल चव्हाण, आनंद वाहूळ आणि धर्मराज गायकवाड यांनी २४ जून रोजी सापळा रचून अट्टल गुन्हेगार गुरमितसिंग तारासिंग कल्याणी ऊर्फ टॉम (४३), कर्नलसिंग तारासिंग कल्याणी (२७) या भावंडांसह अनिल प्रकाश पौळ (२०) आणि संतोष राजू खरे (१९, सर्व रा. मिलिंदनगर, उस्मानपुरा) यांच्या मुसक्या आवळल्या.

यांच्या घरात झाली होती चोरी
गादिया विहारमधील गजेंद्र शिरसीकर यांचे मे रोजी घर फोडण्यात आले. दागिन्यांसह रोकड असा लाख ८२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यापैकी २५ हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. या चोरी प्रकरणातील कल्याणी भावंड आणि अनिल पौळ सध्या जवाहरनगर पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर उस्मानपुरा भागातील जगदीश रतनलाल मुंदडा हे कामानिमित्त २१ मे रोजी बाहेरगावी गेले असता संतोष खरे, गुरमितसिंग कल्याणी आणि पसार झालेल्या अजय ठाकूरने घराच्या पाठीमागील दरवाजाची जाळी तोडून घरात प्रवेश करत दोन तोळ्यांचे दागिने, सोन्याची रुद्राक्षांची माळ, तीन तोळ्यांच्या बांगड्या, एक तोळ्याची चेन असा ऐवज चोरून नेला होता. यातील पाच लाखांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले.

उस्मानपुरा आणि जवाहरनगर भागातील दोघांचे घर फोडून पाच तोळे सोने आणि एक लाख ८२ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या रेकॉर्डवरील चार अट्टल गुन्हेगारांच्या गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळत त्यांच्याकडून पाच लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत. तर त्यांचा साथीदार तथा अट्टल घरफोड्या अजय ठाकूर हा पसार झाला आहे.

माेक्का लागणार का? : शहरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. रोज किमान दोन घरे फोडली जात आहेत. अशा प्रकारे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या रेकॉर्डवरील या टोळीवर मोक्का (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम अॅक्ट १९९९) नुसार कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...