आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज परिसरात डेंग्यूचा तिसरा बळी, प्रशासन झोपेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - वाळूज परिसरात डेंग्यूने थैमान घातले आहे. परिसरातील स्वच्छता, डासनाशक फवारणीकडे दुर्लक्ष करणा-या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज डेंग्यूचा तिसरा बळी गेला. साईनगर सिडकोतील वंदना विजय नीळकंठ (40) यांचे शहरातील हेडगेवार रुग्णालयात सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांचा डेंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे त्यांचे बंधू रवींद्र बबन रडे (44) यांनी सांगितले. किमान आता तरी झोपलेल्या ग्रामपंचायत आणि एमआयडीसी प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.

पंधरा दिवसांपासून वाळूज परिसरात डेंग्यूसह इतर आजारांनी थैमान घातले आहे. परिसरातील रुग्णालयात शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, बजाजनगरातील दोघांसह पंढरपुरातील मुलीचा डेंग्यूसदृश आजाराने बळी घेतला. प्रशासनाकडून काही दिवसांपुरतीच स्वच्छता, फवारणी, जनजागृती करण्यात आली. ही मोहीम थंडावताच पुन्हा सिडकोमधील महिलेचा मृत्यू झाल्यामुळे कामगार कुटुंबीय हादरले आहेत. डेंग्यूचा तिसरा बळी गेलेल्या वंदना नीळकंठ यांना 28 जुलै रोजी तीव्र ताप जाणवत असल्यामुळे त्यांना परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या शरीरातील प्लॅटिलेट्सचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागले. त्यांना थंडी-ताप व मधुमेहाचाही त्रास सुरू झाला. प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे अखेर नातेवाइकांनी त्यांना शहरात हलवण्याचे ठरवले. बजाजनगरातील रुग्णालयाचे 20 हजार रुपये बिल भरून वंदना यांना 2 ऑगस्ट रोजी शहरातील हेडगेवार रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मालवली.
ग्रामपंचायत पुढाकार का घेत नाही?
दिवसेंदिवस उग्ररूप धारण करणा-या डेंग्यू आजाराने परिसरात डोके वर क ाढूनही ग्रामपंचायत आणि एमआयडीसी प्रशासन क ासवगतीने काम करत आहे. ग्रामपंचायतीत शिवसेनेची सत्ता आहे. पंचायत समितीचे दोन्ही सभासद व जिल्हा परिषद सदस्यही शिवसेनेचे आहेत. त्यामुळे परिसरातील कामगार नागरिकांसाठी त्यांनी आरोग्य शिबिरे, फवारणी आदी कामांकरिता आरोग्य विभागाला वेठीस धरायला हवे.

अस्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
परिसरात डेंग्यूसह साथीच्या रोगांनी डोके वर क ाढल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बजाजनगरातील स्वच्छतेचा आणि आरोग्य सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 80 हजार लोकसंख्या असूनही गेल्या 25 वर्षांत बजाजनगरात प्राथमिक आरोग्य केंद्रही उभारण्यात आले नाही. त्यामुळे साथीच्या रोगांवरील उपचार बजाजनगरातील महागड्या व तोकड्या आरोग्य सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयात घ्यावे लागतात. त्यामुळे बजाजनगरात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची गरज आहे.

महिलेचा मृत्यू
डेंग्यूसदृश आजाराचा पहिला बळी शनिवारी (26 जुलै) दुपारी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान विठ्ठल रमेश मगरे (24 वर्षे, रा. सह्याद्री हौसिंग सोसायटी आरएक्स 1/2) या युवकाचा गेला. रविवारी (27 जुलै) दुपारी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेणा-या आश्लेषा संजय शहाणे (6 वर्षे, रा. आरएम 12-7) हिचा डेंग्यू आजाराने दुसरा बळी घेतला. डेंग्यूचा तिसरा बळी सोमवारी (चार ऑगस्ट) वंदना नीळकंठ यांच्या रूपाने गेला. पहाटे शहरातील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा डेंग्यूनेच मृत्यू झाल्याचे त्यांचे बंधू रवींद्र रडे म्हणाले. वंदना यांचा 10 वर्षीय मुलगा ओमकारचीही प्रकृती खालावली आहे. त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.