आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 5 तृतीयपंथीयांची मतदार यादीत नोंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तृतीयपंथीयांसाठी मतदार यादीत स्वतंत्र कॉलम असावा यासाठी संघटनेच्या माध्यमातून लढा देत आयोगास फॉर्ममध्ये बदल करण्यास भाग पाडले. देशभरातील तृतीयपंथीय नावे नोंदवण्यात पुढाकार घेत असताना औरंगाबादेतील तृतीयपंथीयांनी ओळख लपवण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यातून केवळ पाच जणांनीच तृतीयपंथींच्या कॉलममध्ये नावांची नोंद केली आहे.

मतदार यादीत तृतीयपंथीयासाठी स्वतंत्र कॉलम करून वेगळी ओळख मिळावी यासाठी तृतीयपंथीयांनी न्यायालयात लढा देऊन कायद्यात बदल करण्यास भाग पाडले होते. निवडणूक आयोगानेही त्यांच्या नावनोंदणीसाठी असलेल्या फॉर्ममध्ये बदल करीत स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी असे बदल केले. तृतीयपंथीयांना मिळणारी वागणूक आणि त्यांच्या आयुष्याचा विचार करत कायद्यातही बदल करून त्यांच्या उपजीविकेचाही विचार करण्यात आला होता.
तृतीयपंथीयांना निवडणूक लढवणे, नोकरीत संधी आणि सामान्य नागरिकांप्रमाणे वागणूक देण्याची सोय नव्या कायद्यात करण्यात आलेली आहे. मोठ्या शहरातील तृतीयपंथीयांनी मतदार नावनोंदणीत मोठा सहभाग नोंदवला, तर पूर्वी ज्या तृतीयपंथीयांच्या नावापुढील पुरुषच्या रकान्यात टीकमार्क करण्यात आली होती त्यात बदल करण्यासाठी दुरुस्तीचा फॉर्म भरण्यात अनेक जण पुढे आलेले आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची मतदार यादी आयोगाने गुरुवारी (31 जुलै) जाहीर केली. मागील दोन आठवड्यांपासून तहसील कार्यालयात नवीन मतदार नोंदणी सुरू आहे. त्याचबरोबर दर रविवारी आयोगाचे प्रतिनिधी तहसील कार्यालयात नोंदणी अर्ज घेत आहेत. मागील रविवारी जिल्ह्यातून 1158 नवीन मतदारांची नोंदणी झाली होती. त्या तुलनेत या रविवारी (3 ऑगस्ट) 2083 नव्या मतदारांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीत
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत मतदारांना नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध असून त्यांची नावे पुरवणी यादीत येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी ‘दिव्य मराठी’ला बोलताना दिली.

गंगापुरात चार, औरंगाबादेत एक
औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास 25 लाख मतदार असून तृतीयपंथीयांची संख्यादेखील भरपूर आहे. आयोगाने तृतीयपंथीयासाठी केलेल्या तरतुदीचा फायदा जिल्ह्यातील केवळ पाचच जणांनी घेतल्याचे नोंदीवरून स्पष्ट होते. औरंगाबाद (पश्चिम) मध्ये 1 आणि गंगापूर- खुलताबाद विधानसभा मतदारसंघात 4 जणांनी नोंदणी केली आहे.