आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thirteen Minutes A Bohemian Musician Short Film Win 19 Awards

तेरा मिनिटांच्या 'अ बोहेमियान म्युझिशियन' लघुपटाला १९ पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकेकाळी चित्रपट, नाट्य दिग्दर्शन क्षेत्रात मुंबई, पुणे शहरातील कलाकारांचाच दबदबा होता.चित्रपट, नाटकाशी संबंधित मुंबई, पुण्याचेच लोक उत्तम असतात, असाही समज जनसामान्यांत होता. परंतु या परंपरेला तडा देत आैरंगाबाद शहरातील कलाकार, लेखक, छायाचित्रकारांनी या क्षेत्रात पाय रोवत उत्तम चित्रपट, लघुपटांची निर्मिती करत चंदेरी दुनियेत आपले नाव कोरण्यास सुरुवात केली आहे. शहरातीलच सागर सोनार याने बनवलेल्या केवळ १३ मिनिटांच्या लघुपटाला तब्बल १९ पुरस्कार मिळाले आहेत. देशभरातून या कलावंताच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत आहे.

वयाच्या १३ व्या वर्षापासून वडिलांकडून छायाचित्र दिग्दर्शन आणि चित्रपटसृष्टीचे बाळकडू मिळालेल्या सागर आणि त्याच्या मित्रांनी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून पुण्यातील रस्त्यावरील हार्मोनियम वादकावर 'अ बोहेमियान म्युझिशियन' नावाचा लघुपट तयार केला. अवघ्या १३ मिनिटांचा हा लघुपट सध्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजला जात अाहे. समीक्षकांकडूनही त्याचे काैतुक होत आहे. पुण्यातील रस्त्यांवर कुठल्याही पैशाची अपेक्षा ठेवता हार्मोनियम वाजवणाऱ्या ८२ वर्षीय 'केशवलाल' यांच्यावर सागर त्याच्या चार मित्रांनी हा लघुपट बनवला. संगीत क्षेत्राकडून दुर्लक्षित झाल्यानंतर त्यांचा पुण्यातील प्रवास, आयुष्य, संगीतावर त्यांचे असलेले प्रेम, निष्ठा या गोष्टी लघुपटाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला.

अभ्यासातून साकारली कलाकृती : पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये उत्तीर्ण झालेल्या सागरने अभ्यासक्रमाचा एक भाग लघुपट बनवण्यास सुरुवात केली. अनेक वर्षांपासून पुण्याच्या शिवाजीनगरात हार्मोनियम वाजवणारे केशवलाल यांच्याविषयी त्याला माहिती मिळाली. केशवलाल यांच्या आयुष्यावर लघुपट बनवण्याचा निर्धार करत त्यांची व्यथा मांडताना एका कलाकाराच्या आयुष्याचा प्रवास उत्तम तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या लघपुटातून मांडला. वडील संजीव सोनार यांच्यासोबत कार्यक्रम, महोत्सवांदरम्यान लहानपणापासूनच काम पाहत आल्याने नंतर त्या क्षेत्रात उतरल्याने केशवलाल यांच्या लघुपटाला न्याय देऊ शकलो हा लघुपट अनेक चित्रपट महोत्सवांत सादर करू शकल्याचे मत सागरने व्यक्त केले. सागरने लघपुटाचे छायाचित्र दिग्दर्शन, उमाकांत जगताप याने साउंड दिग्दर्शन तर रोचन साहू याने लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. अनुराग वर्मा याने एडिटिंगचे काम सांभाळले.

येथे वाजवला डंका
जयपूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, बंगळुरू इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, इस्टी साइड स्टोरी फिल्म फेस्टिव्हल, सिम्बायोसिस फिल्म फेस्टिव्हल, सिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलसह एकूण ३३ चित्रपट महोत्सवांत हा लघुपट प्रदर्शित झाला असून आतापर्यंत विविध प्रकारांत १९ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

कोण आहेत केशवलाल ?
केशवलालउत्तम हार्मोनियमवादक असून काही चित्रपटांसाठी त्यांनी वादनही केले आहे. व्ही. शांतारामांनी त्यांना मुंबईला नेले होते, परंतु काही काळानंतर त्यांची कला दुर्लक्षित झाल्याने ते पुण्यात रस्त्यांवर हार्मोनियम वाजवू लागले. त्यांना अनेक गाणी मुखोद्गत असून हार्मोनियमवर ते पूर्ण गाणे वाजवतात. सध्या स्थानिकांच्या मदतीने पुण्यात मिळालेल्या फ्लॅटमध्ये ते पत्नी सोनीबाई यांच्यासोबत राहतात.
छायाचित्र: केशवलाल हार्मोनियम वादन करत असताना विद्यार्थ्यांनी लघुपटासाठी चित्रीकरण केले.