आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीस मिनी बसेसचा प्रस्ताव धूळ खात पडून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पर्यटन जिल्हा स्मार्ट शहरातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता सिटी बसेसची संख्या अपुरी आहे. यामध्ये वाढ करण्यासाठी तोट्यातील बस फायद्यात चालवण्यासाठी विभाग नियंत्रकांच्या वतीने राज्य परिवहन विभागाकडे दोन महिन्यांपूर्वी तीस नवीन मिनी बसेसचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र, त्याची पूर्तता अद्याप करण्यात आली नाही. सिटी बसेस कमी असल्याने हजारो प्रवासी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

शहराची लोकसंख्या १४ लाखांवर पोहोचली आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, बिडकीन औद्योगिक वसाहती, शैक्षणिक संस्था, हॉस्पिटल्स, बाजारपेठेत येणारे तसेच वेरूळ अजिंठा लेणीला भेट देण्यासाठी हजारो नागरिक देश-विदेशातून शहरात येतात. या तुलनेत सिटी बसची संख्या दीडशेपर्यंत असायला हवी होती, पण दुर्दैवाने मनपा आणि एसटी महामंडळाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सिटीबसची संख्या केवळ ४१ आहे. दुसरीकडे खासगी अॉटोरिक्षांची संख्या २५ हजार, टुरिस्ट कॅब्स हजार ३८, मिनी बस ११७७, सर्व्हिस वाहन १९४५ आणि जीपची संख्या २९ हजारांवर आहे. मात्र, सिटी बसची संख्या वाढवण्यात महामंडळाला यश आलेले नाही.
सहाकोटींचा तोटा : रिक्षा,टुरिस्ट कॅब्स, मिनी बस आदी खासगी बसमध्ये सिटी बसच्या तुलनेत कमी प्रवासी लागतात. सिटी बसने प्रवास करण्याची शहरातील नागरिकांची अजून मानसिकता नाही. बस भरेपर्यंत प्रवासी थांबत नाहीत. परिणामी सिटी बस रिकाम्या धावत असून महामंडळाला सहा कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे, असा निष्कर्ष विभाग नियंत्रक कार्यालयाने काढला आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी महामंडळ फायद्यात यावे याकरिता ३० मिनी बसचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी पाठवला आहे.

का मिळत नाहीत प्रवासी?
सिटी बसेसचे वेळापत्रक नाही. बस थांब्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. रिक्षा बस एकाच ठिकाणी थांबतात. त्यामुळे बसचे प्रवासी रिक्षावाले पळवून नेतात. मोजक्याच मार्गांवर बस धावतात.

मनपाकडे हस्तांतरित करण्याच्या वावड्या
शहरातीलप्रवाशांची संख्या लक्षात घेऊन मनपाने सिटी बस चालवावी, अशी मागणी जोर धरू लागली होती, पण या संदर्भात मनपाने एसटी महामंडळाशी कोणताही करार अथवा साधी चर्चादेखील केलेली नाही. यापूर्वी मनपाने सिटी बस चालवली आहे, पण २०१० मध्ये बस चालवणे परवडत नसल्याचे सांगून ही सेवा बंद करण्यात आली. तेव्हापासून एसटी महामंडळच शहरात सिटी बस सेवा देत आहे. महामंडळही तोट्यात आहे.