आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Thirty Percent Employee Of Collector Office Is Above Age Of Fortiy

जिल्हाधिकारी नव्हे वृद्धाधिकारी कार्यालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची विविध कामे सांभाळून नियोजन करणारे जिल्हाधिकारी कार्यालय अलीकडे वृद्धाधिकारी कार्यालय झाले आहे. जिल्ह्यातील एकूण कर्मचार्‍यापैकी तब्बल 60 टक्के कर्मचार्‍यांनी वयाची पन्नाशी पार केली असून त्याखालोखाल 30 टक्के कर्मचार्‍यांनी 40 पेक्षा अधिक उन्हाळे-पावसाळे बघितले आहेत. अवघे 10 टक्के कर्मचारी 20 वर्षाखालील आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांचे वयोमान जाणून घेण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने केला असता हा प्रकार समोर आला. ज्येष्ठ कर्मचार्‍यांची संख्या जास्त असल्यामुळे येथील कामे लवकर होत नाहीत. शिवाय ही जुनी मंडळी संगणकापेक्षा जुन्याच पद्धतीने काम करत असल्याने अत्याधुनिकीकरणालाही बाधा येते.

गेल्या काही वर्षांत झालेल्या भरतीमुळे किमान 10 टक्के कर्मचारी तरी तरुण दिसतात आणि विशेष म्हणजे संगणक चालवण्यापासून इंटरनेटवर सफर करण्याची कामे याच मंडळींच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कोणत्याही विभागात गेल्यास तेथे संगणकावर तरुण चेहरेच बसलेले दिसतात. ज्येष्ठांनी अजूनतरी संगणकापासून दूर ठेवल्याचे दिसत असले तरी काही विभागातील कर्मचारी याला अपवादही आहेत.

‘किंग’ मात्र तरुण : जिल्हाधिकार्‍यांना जिल्ह्याचे राजे म्हणजेच किंग संबोधले जाते. गेल्या काही वर्षांत या पदावर तरुण अधिकारी आले आहेत. सध्याचे विक्रमकुमार चाळिशीपासून पाच पावले दूर आहेत. आधीचे कुणालकुमारही त्याच वयाचे होते. अपर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे हेदेखील पन्नाशीच्या पुढे आहेत.

तरुण वाढल्यास काय होईल? : तरुण पिढी ही संगणकावर जास्त काम करते. त्यांच्या कामाची गतीही जास्त असते. त्यामुळे तरुणांची भरती झाल्यास सर्वच कामांना गती मिळू शकेल, असा दावा कर्मचारी संघटनेने केला आहे. 1972 च्या दुष्काळानंतर जिल्हा प्रशासनात मोठय़ा प्रमाणावर भरती झाली होती.

ही मंडळी आता निवृत्तीच्या उंबरठय़ावर आहे. सध्या प्रत्येक महिन्याला किमान 15 ते 30 जण निवृत्त होतात. त्या प्रमाणात भरती झाल्यास 2020 पर्यंत जिल्ह्यातील ही यंत्रणा तरुण दिसू शकेल.