आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वित्त कंपन्यांच्या फासात अडकले हजारो शेतकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी फायनान्स कंपन्यांकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे. दुष्काळामुळे कर्जाचा हप्ता वेळेवर भरता आला नसल्याने वसुलीसाठी शेतकऱ्यांना धमकावणे, अपहरण केले जात आहे. कर्जदारांच्या घरी शेतात जाऊन तगादा लावला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत करून सरकारने या संकटातून आमची सुटका करावी, अशी आग्रही मागणी केली आहे.

जिल्ह्यात दुष्काळामुळे पीक कर्जाची शेतकरी परतफेड करू शकत नाहीत. राष्ट्रीयीकृत बँका दुसरे कर्ज देण्यास तयार नाहीत. सावकारी कायदा लागू असल्याने सावकारी बंद झाली. फायनान्स कंपन्यांनी गावोगावी जाऊन हजारो शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले. या कर्जातून दूध व्यवसायासाठी त्यांनी गायी खरेदी केल्या; पण दुष्काळामुळे चारा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. दूध डेअरीत दुधाला कमी दर मिळाला. यामुळे कर्जाचा हप्ता वेळेत भरता आला नाही. त्यामुळे फायनान्स कंपनीचे कर्मचारी दररोज हप्ता वसुलीसाठी तगादा लावत आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आहेत. वसुलीसाठी गुंड त्यांचे अपहरण करत आहेत. कुटुंब, गावकऱ्यांच्या समक्ष त्यांना अपमानित करत आहेत. नोटीसा पाठवत आहेत. या जाचामुळे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. काही घर सोडून गेले आहेत. जिल्हा प्रशासन, सरकारने त्वरित याकडे लक्ष देऊन आम्हाला वाचवावे, अशी कळकळीची साद पीडित शेतकरी हरिश्चंद्र ठोंबरे, कल्याण घोरपडे, विनोद ठोंबरे, भानुदास बुरकुल, बी. राधाकिसन, रमेश पवार, कैलास राजणे, सर्जेराव चांगुलपाटे, बाळू घोरपडे, संजय पवार, विठ्ठल घोरपडे, उमेश मुळे, नारायण घनवट, प्रभाकर घोरपडे, विकास थाले यांनी केली.

कर्जाच्या तगाद्यामुळे सुरेश भांड (रा. वडजी, ता. पैठण), कृष्णा निर्मळ (रा. लिंबगाव, ता. पैठण) या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, असा दावा या वेळी करण्यात आला. रामसिंग भाटे (रा. टाकळी माळी) यांना पक्षाघाताचा झटका आल्याचे सांगण्यात आले.

हा तर घोटाळा : शेतकऱ्यांनीआरोप केला की, फायनान्स कंपन्या गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना सातबारा किंवा घराचा घेऊन कर्ज देत आहेत. लाख ५० हजार रुपये कर्ज मंजूर केल्यास ३० हजार रुपये विमा, मॉर्डगेजच्या नावाखाली कापून घेतले जातात. त्याची पावती दिली जात नाही. हा घोटाळा लाखो रुपयांचा आहे. थकीत रकमेवर चक्रवाढ व्याज लावले जाते, असे चंद्रभान ठोंबरे यांनी सांगितले.

हृदयविकाराचा झटका
विस्तार फायनान्सकडून माझ्या वडिलांनी साडेतीन लाखाचे कर्ज घेतले. हप्ता वेळेवर फेडता आला नाही. फायनान्स कंपनीने माझ्या वडिलांना अपमानित केले. या वागणुकीमुळे त्यांना दहा दिवसांपूर्वी हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. यातून ते बचावले. पण ते कुणाशीच बोलत नाहीत. यामुळे कुटुंब त्रस्त आहे. विनोद ठोंबरे, पीडित शेतकऱ्याचा मुलगा.

भरपाई मिळावी
शेतकऱ्यांना यातना देणाऱ्या सर्व फायनान्स कंपन्यांची चौकशी व्हावी. आत्महत्येस जबादार कंपन्यांवर नियमाप्रमाणे गुन्हे दाखल करून नुकसान भरपाई मिळावी. कर्जाची परतफेड करण्यासाठी सावकारी कायदा लागू करावा. जयाजीरावसूर्यवंशी, प्रदेश अध्यक्ष, अन्नदाता शेतकरी संघटना.

कराराप्रमाणे कर्जाची वसुली
नियमाप्रमाणे कर्ज दिले. कराराप्रमाणे कर्जाची वसुली करत आहोत. शेतकरी खोटे आरोप करत आहेत. ऋषीकेश गायकवाड, ब्रँच मॅनेजर, विस्तार फायनान्स कंपनी. औरंगाबाद विभाग.
बातम्या आणखी आहेत...