आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणाची गंगा : हजारो कलाम घडवण्याचा संकल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ग्रामीण शहरी भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंत जागतिक दर्जाचे मोफत शिक्षण देण्यासाठी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने अखिल भारतीय शिक्षा संशोधन संस्थेतर्फे शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी आगामी वर्षात ५६० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार असून भविष्यात हजारो कलाम घडवण्याचा विडाच या संस्थेचे संचालक सतीश गोरे यांनी उचलला आहे. या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी कोटी ६० लाख रुपये निधी राखीव ठेवला जाणार आहे.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना शिष्यवृत्ती मिळाल्याने ते उच्च शिक्षण घेऊ शकले. ग्रामीण शहरी भागात त्यांच्यासारखे हुशार विद्यार्थी आहेत. परंतु योग्य संधी मिळत नसल्याने ते मागे राहतात. अशा विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य संधी देऊन हजारो कलाम घडवण्यासाठी त्यांच्याच नावाने संस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक खर्च शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दिला जाणार आहे. प्रतिविद्यार्थी दरवर्षी ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. वसतिगृह, भोजन, प्रवास खर्च, सहल, वार्षिक स्नेहमिलन आणि इतर स्थळांना भेटी आदी खर्चाचा यात समावेश नाही.

दोन लाख विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण : यापूर्वीगोरे यांच्या महाराष्ट्र संगणक प्रशिक्षण मंडळाने दोन लाख मुलांना संगणकाचे मोफत बेसिक प्रशिक्षण दिले. शालेय संगणक प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दहा हजार विद्यार्थ्यांना सहाशे रुपये प्रतिमहिना शिष्यवृत्ती दिली. पाच हजार मुलांना ४० हजार रुपये किमतीच्या डिप्लोमा इन अॅडव्हॉन्स कॉम्प्युटर कोर्सचेही मोफत प्रशिक्षण दिले.

असे निवडणार विद्यार्थी : जिल्ह्यातील सीनियर केजी ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी या शिष्यवृतीसाठी पूर्वपरीक्षादेऊ शकतात. शालेय अभ्यासावर आधारित १०० गुणांची चाचणी घेऊन त्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची निवड होईल. सामान्य ज्ञान, पायाभूत गुणवत्ता चाचणी, बौद्धिक क्षमता, भाषा आणि अंकगणित अशी प्रत्येक विषयाची २० गुणांची चाचणी असेल.

काय मिळतील सुविधा ? : उत्तीर्णविद्यार्थ्यांना २०१६-या शैक्षणिक वर्षापासून आपतगाव येथील संस्थेच्या इंरा इंटरनॅशनल स्कूल आणि इरा गुरुकुल विद्यालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यात येईल. या शाळांचे शैक्षणिक शुल्क या शिष्यवृतीमधून मिळेल. विद्यार्थ्यांना इंग्रजी सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळेल. त्यासाठी सीबीएसई आणि एसएससी या बोर्डाचे अभ्यासक्रम निवडता येतील. गायन, वादन, कराटे, हस्ताक्षर, योगा, जर्मन, फ्रेंच आणि लॅटीन भाषा शिकवल्या जातील. तसेच लीडरशिप, आत्मविश्वास, बिझनेस मॅनेजमेंट, स्मॉल इव्हेंट, बँकिंग औद्योगिक प्रशिक्षणही दिले जाईल. तीन महत्त्वाचे खेळ विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिकवले जातील. सर्व शासकीय कार्यालयांना भेटी आणि प्रत्यक्ष कामाकाजाचे प्रात्यक्षिकही दिले जाणार आहे.

३० जानेवारीपर्यंत करावे लागणार अर्ज : याशिष्यवृत्तीच्या पूर्व परीक्षेसाठी ३० जानेवारी २०१६ पर्यंत संस्थेच्या इरा इंटरनॅशनल स्कूल, एन-६ देवगिरी बँकेसमोर अथवा मुख्य कार्यालय एन २, प्लॉट नंबर ७८, सर्व्हे नंबर ७०, कामगार चौक येथे नोंदणी करावयाची आहे. १४ फेब्रुवारी २०१६ रोजी साडेदहा ते एक पर्यंत परीक्षा घेतली जाणार आहे. निकाल २९ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहीर करून सात मार्चपासून प्रवेशाला प्रारंभ होणार आहे.

हजारो विद्यार्थी घडावेत
शिष्यवृती योजनेतून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांसारख्या व्यक्तिमत्त्वाचे हजारो विद्यार्थी घडावेत, अशी आमची संकल्पना आहे. कलाम यांनीही शिष्यवृती घेऊन महासत्तेचे स्वप्न बघितले. त्यात या विद्यार्थ्यांचेही सहकार्य महत्त्वाचे आहे. - सतीश गोरे, संचालकअखिल भारतीय शिक्षा संशोधन संस्था