आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Thousands Of Triangale Flag Falling In Railway Track And Slum Area

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हजारो तिरंगे रेल्वे रूळ आणि गलिच्छ ठिकाणी फेकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राष्ट्रध्वजाची विटंबना करण्याचा प्रकार शिवाजीनगर परिसरात घडला आहे. दोन ते अडीच हजार ध्वज परिसरातील गलिच्छ ठिकाणी आणि रेल्वे रुळांवर टाकली होती. काही सजग नागरिकांनी माहिती दिल्यानंतर डीबी स्टारने पाहणी केली असता संपूर्ण परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी तिरंगे पडलेले आढळले. हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा नागरिकांचा संशय आहे.


नेमके काय झाले? : शिवाजीनगरात फोस्टर डेव्हलपमेंटचे एमबीए कॉलेज आहे. याच्या शेजारी असणार्‍या मैदानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रभात शाखा भरते. शुक्रवारी सकाळी शाखेचे सदस्य आले असता त्यांना मैदानाला लागून असलेल्या कचर्‍यात 30-35 राष्ट्रध्वज असल्याचे लक्षात आले. त्यांनी परिसराची पाहणी केली असता मैदानाच्या मागील बाजूने जाणार्‍या रेल्वे रुळांवरही राष्ट्रध्वज पडल्याचे दिसून आले. अजून पुढे गेल्यावर रेल्वेच्या पुलाखाली अनेक ध्वज पडलेले होते. झाडाझुडपात, कचर्‍यात सगळीकडे ते अस्ताव्यस्त पद्धतीने टाकलेले दिसून आले. राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे विटंबना झाल्याचे पाहून व्यथित नागरिकांनी ही माहिती शिवाजीनगर पोलिस आणि डीबी स्टारला दिली.

कोरे, फाडलेले आणि चुरगळलेले.. : हे राष्ट्रध्वज येथे कोठून आले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता फेकण्यात आलेले ध्वज दुकानातून आणावेत एवढे कोरे होते. ते काही ठिकाणी गठ्ठय़ाने फेकण्यात आले होते, तर काही सुटे करून भिरकावण्यात आल्याचा संशय आहे. अध्रेअधिक राष्ट्रध्वज सुस्थितीत होते. काहींना चुरगाळून, तर काहींचे तुकडे करून टाकण्यात आल्याचे दिसले. झेंड्यांचा एक गठ्ठा रुळांवर टाकण्यात आला होता. एकूण झेंड्यांची संख्या दोन ते अडीच हजारांच्या घरात होती.


पोलिसांच्या उपस्थितीत तिरंगे जमा : हा गंभीर प्रकार लक्षात येताच पोलिसांना बोलावण्यात आले. कॉन्स्टेबल एन. जे. बोबडे आणि टी. के. पवार, पोलिस उपनिरीक्षक खालेद पठाण यांच्यासमोर विनय शेळके, नंदकिशोर हजारे, नरेंद्र टेकाळे, अरविंद मुनतकर आदींनी झेंडे जमा केले व सन्मानपूर्वक एका पिशवीत भरून ते पोलिसांकडे सुपूर्द केले.


राष्ट्रध्वजाची आचारसंहिता : राष्ट्रध्वजाचा देशाचे प्रतीकचिन्ह आणि नावांमध्ये समावेश आहे. याअंतर्गत त्याचा गैरवापर करण्यास बंदी आहे. नॅशनल ऑनर अँक्ट 1971 च्या कलम 69 अन्वये तिरंग्याचे कामकाज नियंत्रित केले जाते. 2002 मध्ये राष्ट्रध्वजासाठीची आचारसंहिता अस्तित्वात आली. यानुसार राष्ट्रध्वज खराब किंवा मळका झाला तर त्यास तशाच अवस्थेत ठेवता येत नाही, तर त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावायला हवी. ती खासगीत लावली पाहिजे. दुसरे म्हणजे शक्यतो ध्वज जाळावा किंवा पुरून टाकायला हवा.


गुन्हे दाखल करा
हे राष्ट्रध्वज जाणीवपूर्वक रस्त्यावर फेकून दिल्याचे दिसते. हे कोणा देशद्रोह्याचे कृत्य असावे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अपमान सहन करणार नाही. पोलिसांनी याप्रकरणी तत्क ाळ गुन्हे दाखल करून आरोपींवर कारवाई करावी.
ललित माळी, नागरिक


कारवाई करणार
राष्ट्रध्वजाची विटंबना हा गंभीर गुन्हा आहे. हे झेंडे क ोठून आले, ते येथे कोणी टाकले, ते शैक्षणिक संस्थेतील आहेत की एखाद्या दुकानातून चोरून कोणी येथे फेकले, याची चौकशी करू.
खालेद पठाण, पोलिस उपनिरीक्षक, शिवाजीनगर


सुन्न करणारा प्रकार
या घटनेने मन सुन्न झाले. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे अजून तरी पाहण्यात आलेले नाही. हे प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेऊन गुन्हे दाखल करावेत.
ज्ञानेश्वर बोरसे, नागरिक