आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Acussed Freed In Case Of Dr.Choudhari Murder, Bench Cancelled Execution

डॉ. चौधरी खटल्यातील तिन्ही आरोपी निर्दोष, फाशीची शिक्षा औरंगाबाद खंडपीठात रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. विजया चौधरी (४५) खून खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने माफीच्या साक्षीदाराचा पुरावा ग्राह्य धरला नाही. या प्रकरणातील पुरावेही खंडपीठाला विश्वासार्ह वाटले नसल्याने जळगाव सत्र न्यायालयाने तिघा आरोपींना ठोठावलेली फाशी, जन्मठेप व सक्तमजुरीची शिक्षा रद्द करत न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

राज्यभर खळबळ उडवून देणा-या जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षात झालेल्या खून खटल्यात तिन्ही आरोपी पोलिसांच्या सदोष तपासामुळे निर्दोष सुटले आहेत. डॉ. विजया चौधरी यांना त्यांचे पती डॉ. अरविंद चौधरी यांनी दुपारी दोन वाजता रुग्णालयात सोडले. सायंकाळी ५ नंतर त्यांना एक समारंभात सहभागी व्हायचे असल्याने त्यांनी सोन्याचे नेकलेस, चार बांगड्या व इतर दागिने घातले होते. रात्री आठ वाजता पतीने फोन केला तेव्हा डॉ. विजया यांचा मोबाइल बंद होता. पती डॉ. अरविंद यांनी १३ मार्च २०१२ रोजी
सकाळपर्यंत पत्नीचची वाट पाहिली परंतु त्या आल्या नाही.

त्यांनी रुग्णालयातील डॉ. नितीन भारंबे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दुपारी तीन वाजता एका मृतदेहाचे शवविच्छेदन केल्याचे सांगितले. त्यानंतर त्या दिसल्या नसल्याचे सांगितले. पवन जाधव नामक कर्मचा-यानेही असेच सांगितले. हॉटेलमधील समारंभासही त्या गेल्या नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पती डॉ. अरविंद चौधरी यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात पत्नी हरवल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी रुग्णवाहिका चालकासह तिघांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला, तर गुलाब या आरोपीस माफीचा साक्षीदार बनवले.

सत्र न्यायालयाचा निकाल
जळगाव सत्र न्यायालयाने प्रकरणात डॉक्टरचा खून करून मृतदेह नेरी नाक्यावर जाळून टाकल्याप्रकरणी १८ डिसेंबर २०१३ रोजी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. उज्वल निकम यांनी बाजू मांडली. खटल्यात माफीचा साक्षीदार गुलाबला शिक्षा झाली नाही. युवराजला फाशी तर पंकजला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सोने खरेदी करणा-या महेशकुमार वर्मा यास दोन वर्षाची सक्तमजुरी तर त्याची पत्नी प्रेमलताची निर्दोष मुक्तता केली.

आरोपी सध्या तुरूंगात
सत्र न्यायालयाच्या शिक्षेनंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणीसाठी आले. न्या. संभाजी शिंदे व न्या. पी. आर. बोरा यांच्यासमोर झाली. त्यांनी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. हे आरोपी सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड. श्रीनिवास गणाचारी, अ‍ॅड. गोविंद कुलकर्णी, अ‍ॅड. निर्मल दायमा, अ‍ॅड. कुणाल काळे, अ‍ॅड. अमोल जोशी यांनी साहाय्य केले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील गिरीश थिगळे नाईक, मृताच्या वडिलांतर्फे अ‍ॅड. सुरेखा महाजन यांनी बाजू मांडली.