आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three And A Half Thousand Teachers In The District About To Go

जिल्ह्यातून जाणार साडेतीन हजार शिक्षक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हा परिषद शिक्षक समितीचे पाच दिवसीय अधिवेशन पार पडल्यानंतर आता शिक्षक सेनेचे अधिवेशन पाच ते सात फेब्रुवारीदरम्यान परभणीत होणार आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावरच हे अधिवेशन होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाशी प्रशासन आणि शिक्षकांना कोणतेच सोयरसुतक नसल्याचे दिसते.
अधिवेशनासाठी किमान पन्नास टक्के शिक्षकांनी शाळेवर उपस्थित राहणे अपेक्षित आहे. या कालावधीत बुडणारा अभ्यासक्रमही शिक्षकांनी अधिवेशनाहून परतल्यावर घेणे बंधनकारक आहे. मात्र यापूर्वी पार पडलेल्या दोन्ही शिक्षक संघटनांच्या अधिवेशनानंतर असा कोणताच प्रयत्न शिक्षकांनी केला नाही. त्यासाठी प्रशासनानेही काही ठोस पावले उचलली नाहीत. शिक्षकांनी नाताळादरम्यान पाच दिवस सुट्यांचा आनंद घेतला. या काळात दोन्ही संघटनांनी अधिवेशन घेतले नाही. मुलांची परीक्षा झाल्यानंतरही अधिवेशन होऊ शकले असते. मात्र शिक्षकांना पगारी रजेचा विरंगुळा हवा असल्याचे जिल्हा परिषदेत बोलले जात आहे.
शिक्षक संघटनेतील सदस्यांशी संपर्क साधून आपण परीक्षा काळात घेत असलेले अधिवेशन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला कारणीभूत नाही का. परीक्षा संपल्यावर का अधिवेशन घेतले नाही, असा प्रश्न ‘दिव्य मराठी’ने उपस्थित केला असता यावर विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच तीन दिवस अधिवेशन घेत आहोत.
पूर्व नियोजित कार्यक्रम असल्याने त्यात बदल शक्य नाही, असे सांगितले गेले. तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याचीही शिक्षक काळजी घेणार असल्याचे सदानंद माडेवर यांच्यासह अन्य तीन सदस्यांनी सांगितले.