आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षात सहप्रवासी बनून लुटणारे तिघे गजाअाड; पोलिस निरीक्षक मधुकर सावंत जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रिक्षात सहप्रवासी म्हणून बसायचे आणि निर्जन ठिकाणी चाकूहल्ला करत प्रवाशाकडील पैसे, मोबाइल हिसकावून घेणाऱ्या टोळीतील शेख शकील शेख आरेफ (२१, रा. कासंबरी दर्गाजवळ, पडेगाव), शेख शाहरुख शेख सलाऊद्दीन (२०, रा. उस्मानपुरा) आणि शोएब सलीम कुरेशी (२०, रा. आंबेडकर चौक, चिकलठाणा) या लुटारूंना गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी जिवाची पर्वा करता अटक केली. लुटारूंच्या हल्ल्यात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत जखमी झाले. 

पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार शुकवारी रात्री या टोळीने कर्णपुरा मैदानावर, तिसगाव फाट्याजवळ दोघांना चाकू हल्ला करत लुटले. त्यात बालाजी बापूराव वैद्य (३५, रा. हिंदुस्थान आवास, नक्षत्रवाडी), दिनेश सुरेश लोढा (२६, रा. उत्तमपुरी, बजाजनगर) जखमी झाले. लोढा यांच्या पोटात चाकूचा वार असून त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहे. वैद्य शुक्रवारी औरंगपुऱ्यात जेवण करून रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीने (एमएच-२०-बीके-११६८) घरी परतत असताना कर्णपुरा मैदानावर लघुशंकेसाठी थांबले. तेथे शेख शकीलने झडप घालत त्यांना पकडले. वैद्य यांनी प्रतिकार केला. तोपर्यंत शाहरुख, शोएब तेथे आले. शकीलने वैद्यांच्या पाठीवर, पायावर चाकूने वार केला. गळ्याला चाकू लावून त्यांचे सर्व कपडे काढून घेतले. यानंतर त्यांची दुचाकी, मोबाइल आणि पाचशे रुपयांची रोकड हिसकावत तिघांनी धूम ठोकली. वैद्य तशा अवस्थेत कर्णपुऱ्यातील राममंदिराजवळ आले. तेथील नागरिकांनी त्यांना कपडे दिले. तोपर्यंत छावणी पोलिस दाखल झाले. त्यांनी वैद्य यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. 

ही घटना घडल्यानंतर वैद्य यांना लुटल्यावर दोन लुटारू वाळूजकडे जाणाऱ्या रिक्षात लोढा यांच्यासोबत बसले. रेल्वे ओव्हरब्रिजजवळ तिसऱ्या लुटारूने दुचाकी आडवी लावून रिक्षा रोखली. लोढांना बाहेर खेचून त्यांच्या पोटात चाकूचा वार केला. त्यांचा मोबाइल, चांदीचे ब्रासलेट, अंगठी पंधराशे रुपये हिसकावून पळ काढला. पोलिसांनीच लोढांना घाटीत दाखल केले. 
 
मोबाइल मुळे लागला झटपट तपास 
दरम्यान, वैद्य, लोढा यांनी दिलेल्या माहितीवरून तसेच दोघांच्या मोबाइल लोकेशनवरून पोलिसांनी लुटारुंचा माग काढला. शनिवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास त्यांच्या घरातून अटक केली. या वेळी शकिलने केलेला चाकूचा निसटता वार सावंत यांच्या हाताला लागला. कारवाईत उपनिरीक्षक राहुल रोडे, जमादार शिवाजी झिने, विलास वाघ रितेश जाधव यांचा समावेश होता. त्यांना ५० हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. दरम्यान, या लुटारूंवर यापूर्वी जालना, उस्मानपुरा पोलिस ठाण्यांमध्ये लुटमारीसह चोरीचे गुन्हे दाखल आहेत, असे समोर आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...