आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन दिवस शहरातील पेट्रोल पंप बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्य सरकारने रस्ते आणि शहर विकासाच्या नावाखाली पेट्रोल आणि डिझेलवरील विक्रीकर वाढवल्याच्या निषेधार्थ तसेच कमिशन वाढवून द्यावे या मागणीसाठी पेट्रोल पंपधारकांनी ‘नो पर्चेस’ आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे रविवार ते मंगळवार असे तीन दिवस शहरातील पेट्रोल पंप सुरू राहूनही तेथे पेट्रोल मिळणार नाही. हा निर्णय औरंगाबाद पेट्रोलियम डीलर असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला.
औरंगाबादसह पाच पालिका क्षेत्रांसाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात विक्रीकर वाढवला आहे. त्यामुळे शहरात पेट्रोल 61 पैसे, तर डिझेल 1 रुपया 9 पैशांनी महाग झाले आहे. हा वाढीव दर शुक्रवार, 1 जूनपासूनच शहरातील पेट्रोल पंपांवर लागू झाला आहे. पेट्रोल-डिझेल दर आणि त्यावरील विक्रीकर वाढवण्यात आला असला तरी त्या तुलनेत पेट्रोल पंपधारकांचे कमिशन वाढवण्यात आलेले नाही. हा वाढीव विक्रीकर कमी करावा आणि कमिशन वाढवावे या मागणीसाठी दोन दिवस पेट्रोल खरेदी न करण्याचा निर्णय पंपधारकांनी घेतला आहे. दर रविवारी पानेवाडीचा डेपो बंद असल्यामुळे पेट्रोल खरेदी बंद असते. त्यामुळे रविवारी शहरातील पेट्रोल पंप अगोदरच ‘ड्राय’ असतात. त्यातच पेट्रोल पंपधारक पेट्रोल आणि डिझेलची खरेदी करणार नसल्यामुळे रविवार ते मंगळवार असे तीन दिवस पंपांवर ‘नो स्टॉक’च्या पाट्या झळकणार आहेत.
असोसिएशनच्या बैठकीत अध्यक्ष चंदन खिंवसरा, सचिव अखिल अब्बास, संभाजी शिंदे, अमरजितसिंग छाबडा, एच. डी. सोनवणे, राजेंद्र सलुजा, राजेश पवार, संदीप घंटे, गिरीश उबाळे, सूर्यकांत अंबरवाडीकर, धर्मेंद्र सेठ उपस्थित होते.