खुलताबाद- धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गल्लेबोरगाव नजीकच्या टाकळी फाट्यावर क्रेन- दुचाकी अपघातात तीन जण ठार झाले. ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. मृत तिघेही कन्नड तालुक्यातील बहिरगावचे रहिवासी आहेत. तिघांच्या अपघाती मृत्यूमुळे बहिरगाववर शोककळा पसरली होती.
तिघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी क्रेन चालकाविरोधात खुलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालक फरार आहे.
कन्नड तालुक्यातील बहिरगाव येथील संदीप प्रल्हाद शिरसाठ (वय ३० वर्षे), दत्तात्रय गणपत जाधव (वय २७ वर्षे), राहुल सुरेश पवार (वय २४ वर्षे) हे तिघे गुरुवारी बहिरगावहून दुचाकी क्र. एमएच २० डीयू ९६१० वर औरंगाबादकडे निघाले होते. ते गल्लेबोरगाव लगतच्या टाकळी फाट्यावर येतातच समोरून येणाऱ्या क्रेन क्र. एमएच १८ एन ९६२५ या जड वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात संदीप शिरसाठ हे जागीच ठार झाले. तर दत्तात्रय जाधव राहुल सुरेश पवार हे दोघेजण गंभीर जखमी झाले होते. दोघांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
क्रेनचालकाचा ताबा सुटला
कन्नडकडेजाणाऱ्या क्रेनचालकाचा वेगामुळे वाहनावरील ताबा सुटला दुचाकीवर क्रेन धडकले. धडक इतकी जोरदार होती की दुचाकी सुमारे सव्वाशे फूट लांबपर्यंत घसरत गेली.
तिघेही मित्रच
अपघातात मृत तिघेही मित्र असून संदीप शिरसाठ हा वाळूज एमआयडीसीत एका कंपनीत कामाला होता. तो दररोज दुचाकीवर बहिरगाव ते वाळूज अपडाऊन करायचा. त्याचे मित्र दत्तात्रय जाधव हे रांजणगाव शेणपुंजी येथील न्यू हायस्कूल शाळेवर शिक्षक होते. तर राहुल पवार हे औरंगाबादला महेंद्र फायनान्समध्ये कामाला होते. या दोघांनी औरंगाबादपर्यंत सोडयला संदीपला सांगितले होते.