आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निराशा : अनिता घोडेले, कला ओझा, रशीदमामूंना मतदारांनी नाकारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिका निवडणुकीत तीन महापौरांच्या पदरात मतदारांनी पराभवाचे माप टाकले आहे. त्यात मावळत्या महापौर कला ओझा, २०१० च्या कार्यकारिणीतील पहिल्या महापौर अनिता घोडेले आणि १९९७-९८ मध्ये युतीची सत्ता असताना महापौर राहिलेले रशीदमामू यांचा समावेश आहे.
महापालिकेच्या राजकारणात महापौरपदाला सर्वोच्च स्थान आहे. या पदाला समाजात आदर मिळतोच. शिवाय प्रशासकीय कारभारातही महापौरांचा शब्द महत्त्वाचा मानला जातो. त्यांनी केलेल्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाळाव्याच लागतात. शिवाय विकासकामांसाठी भरीव तरतूद करणे, कामांना वेग देणे, कामे दर्जेदार होतील, याची काळजी घेणे यातही महापौरपद प्रभावी असते. त्यामुळेच महापौर राहिलेल्या व्यक्ती पुन्हा नगरसेवकपदाच्या निवडणुकीत विजयी होतील, असे मानले जाते. म्हणूनच बाळकृष्णनगरात कला ओझा यांना उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी शहरात कोणती विकासकामे केली, कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले, असा प्रश्न उपस्थित झाला होता.
शिवसेनेच्या गोटातूनच ओझांना संधी देऊ नका, असेही म्हटले जात होते. मात्र, खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हट्टाग्रहापोटी ओझा यांना उमेदवारी जाहीर झाली; परंतु त्याच वेळी त्यांचा पराभव निश्चित झाला होता. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत त्यांच्यासाठी खैरे वगळता अन्य कोणताही बडा नेता फिरकला नाही. कार्यकर्त्यांची मोठी फौजही नव्हती. त्यातच भाजपची बंडखोरी झाल्याने ओझांची वाट अधिकच बिकट झाली.
१९९७-९८मध्ये राज्यात युतीची सत्ता, महापालिकेतही युतीकडे बहुमत होते. मात्र, महापौरपद भटक्या-विमुक्तांसाठी राखीव होते आणि युतीकडे या प्रवर्गातील नगरसेवक नव्हता. त्याचा फायदा त्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या रशीदमामूंना मिळाला. शहरातील सर्वोच्च पद मिळाल्यानंतर त्यांना फारशी नशिबाची साथ मिळाली नाही. गरमपाणी येथील मूळ रहिवासी असूनही यंदा ते चेतनानगर वॉर्डात शिरले. तेथील मतदारांनी त्यांना नाकारले. याशिवाय मावळते उपमहापौर संजय जोशी यांच्या पत्नी स्मिता जोशी, माजी महापौर डॉ. भागवत कराड यांच्या पत्नी डॉ. अंजली कराड, माजी उपमहापौर किशोर थोरात, स्थायी समितीचे माजी सभापती रतनकुमार पंडागळे, काशिनाथ कोकाटे यांनाही पराभवाचा धक्का बसला.

घोडेलेंना घराणेशाही भोवली

२०१०मध्ये महापौर राहिलेल्या अनिता नंदकुमार घोडेले यांनाही नक्षत्रवाडीतील मतदारांनी नाकारले. अपक्ष विमल कांबळे यांनी त्यांना सुमारे ४०० मतांनी पराभूत केले. घोडेले कुटुंबीय गेल्या १५ वर्षांपासून कायम सत्तेत आहे. कधी शिवसेनेतून, कधी अपक्ष म्हणून नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले निवडून आले.
२०१० मध्ये नंदकुमार यांचे बंधू आनंद नारेगाव वॉर्डातून काँग्रेसकडून विजयी झाले. त्यामुळे घोडेलेंची घराणेशाही सुरू असल्याचे चित्र होते. शिवसेनेतील एक गट त्यांच्याविरुद्ध सक्रिय होता. विशेषत: शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी आणि घोडेलेंमध्ये कमालीचे वितुष्ट होते. त्याचाच फटका अनिता घोडेलेंना बसला.